बरेली : टिकटॉक हे माध्यम तरुणाईमध्ये कमालीचं लोकप्रिय माध्यम आहे. अनेक तरुण तरुणी टिकटॉकचा वापर करून भन्नाट व्हिडीओ बनवत असतात. मात्र भन्नाट व्हिडीओ करणे तरुणाच्या जीवावर बेतले. एका १८ वर्षीय तरुणाला टिकटॉक व्हिडीओ बनवताना पिस्तूलातुन गोळी सुटल्यामुळे जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली.
टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी एका १८ वर्षीय मुलाने त्याच्या आईकडे हट्ट धरला. त्यामुळे आईला नाईलाजाने कपाटात ठेवलेली बंदूक द्यावी लागली. टिकटॉक केल्यानंतर पिस्तूल ठेऊन देऊ, असे मुलाने आईला सांगितले होते. टिकटॉक बनवण्यासाठी आईनंही त्याला कपाटातील बंदूक दिली हातात पिस्तुल घेऊन टिकटॉक करीत असताना बंदुकीतून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला.
अचानक झालेल्या या घटनेमुळे आईलाही काहीच करता आले नाही. या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव केशव असून त्याचे वडील सैन्यात आहेत. केशव कुमारचा टिकटॉक करताना मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.