टीम, HELLO महाराष्ट्र |पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासह दोन्ही शहरांतील प्रवासाचे अंतर २५ ते ३० मिनिटांनी कमी करण्यासाठी खालापूर टोल ते कुसगावपर्यंत पर्यायी रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी दोन बोगदे करण्यात येणार असून, अडोशी आणि कुसगाव भागात या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प साडेपाच हजार कोटी रुपयांचा असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये वाहतुकीची कोंडी होत असते. या भागामध्ये सुमारे सहा किलोमीटर अंतराची वळणे आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळही वाढतो. ही बाब लक्षात घेऊन पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खालापूर टोल नाक्यापासून थेट कुसगावपर्यंत करण्यात येणाऱ्या या पर्यायी रस्त्यासाठी दोन बोगदे आणि दरीतील दोन उड्डाण पूल असणार आहेत. या शिवाय खालापूर टोल ते खोपोली एक्झिट या दरम्यान रस्त्याच्या दोन मार्गिका वाढविण्यात येणार आहेत. द्रुतगती मार्गावरील पर्यायी रस्ता एकूण २८.७ किलोमीटरचा असणार आहे. दोन्ही बाजूने प्रत्येकी चार मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. आपत्कालीन स्थितीत बोगद्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग असणार आहे. दोन्ही बोगदे डोंगराखाली दीडशे मीटर अंतरावर असणार आहेत.
दरम्यान द्रुतगती मार्गावर पर्यायी रस्त्याच्या प्रकल्पासाठी सध्या बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, इतर कामांसाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. वनविभागाची ८० हेक्टर जागा या प्रकल्पासाठी लागणार आहे. या जागेच्या बदल्यात दुसरी जागा देण्याबाबत रायगड आणि पुणे जिल्’ात चाचपणी करण्यात येत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून, या भागात ४० हजार वृक्ष लावण्याचेही नियोजन असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.