नवी दिल्ली : आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्रातच तसेच देशभरात या विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत. या संतप्त भावना लक्षात घेऊन भाजपने हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पुस्तक मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही, मी माफी मागणार नाही, असे म्हणत लेखक, भाजप नेते जयभगवान गोयल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
गोयल यांनी म्हंटले की, जर माझे पुस्तक वाचून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझ्या पुस्तकाच्या पुनर्लेखनाचा विचार करू शकतो. ज्या प्रकारे नरेंद्र मोदी आज काम करत आहेत अगदी तसेच काम शिवाजी महाराजांनी केलेले आहे. पंतप्रधान मोदींची काम करण्याची शैली आणि शिवाजी महाराजांशी शैली एकच आहे. मी शिवाजी महाराजांचा सन्मान जितका करतो तितका सन्मान महाराष्ट्रातील लोकं देखील करत नसतील.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिल्याची माहिती टीव्ही ९ ला दिली होती. पक्षाच्या आदेशानंतरही गोयल यांची भूमिका ठाम असल्यामुळे भाजप काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.