हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे समाजाला काळिमा फासणारी, अत्यंत दुर्देवी घटना घडली. २५ वर्षीय प्राध्यापिकेला विवाहित तरुणाने एकतर्फी प्रेमातून पेटवून दिले. आज ती मुलगी हॉस्टिपटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत आहे. समाजाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेवर हॅलो महाराष्ट्राचे बीड प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी सविस्तर लेख लिहिला आहे. वाचा सविस्तर.
एका पिढीने वर्षेभर मुलीकडे नुसते पाहत पाहत नजरेने साद घातली आहे, अगदी गावरान भाषेत सांगायचे झाले तर लाईन मारलेली आहे, एक वर्षे नुसते पाहण्यात आणि पुढच्या वर्षात डोंगराचा पेन, आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई करून मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही वाले पत्र लिहिले जायचे. आज मात्र जी आवडते तिच्याशिवाय जगण्याचे सोडा तिचे जगणेच संपवून टाकण्यापर्यंत प्रेम पोहचले आहे. पोरीला चिठ्ठी दिली तर हो का नाही दोन दिवसात उत्तर दे, ते ही मैत्रिणीकडे आणि नाही असेल तर चिठ्ठी फाडून टाकणे, कुणाला सांगू नये अशी भीती असणारा प्रियकर आता नाही म्हणताच पेटवून देऊ लागला आहे. कुणाचे अपयश आहे हे कौटुंबिक संस्काराचा भाव का शिक्षण प्रणालीचा, का मग वाढत्या सनीच्या लीलांचा. समाजाने याचा विचार केला पाहिजे. लेकी सर्वांच्या घरी असतात उद्या त ला कुणी असे पेटवून दिले तर आम्ही दोष कुणाला द्यायचा? प्रगत समाजाला का मग त्या युवा पिढीला जी जस्ट चिल च्या नावाखाली उन्मादी आणि उतावीळ झालेली आहे.
एखादी मुलगी आवडणे हे प्रेम अजिबात नसते ते आकर्षण असते. तिच्या शरीराला पाहून प्रभावित होणे ज्याला प्रेम या नावाने खपवले जाते. आकर्षण अल्पायुशी असते म्हणून आजच्या पिढीत वर्षातच ब्रेकअप अध्याय असतो आणि ये गई तो दुसरीचा देखील प्रपंच असतो, प्रियसीची संख्या वाढवण्यात तारुण्याचे यश मोजणारी पिढी शेवट पर्यत प्रेम मिळवूच शकत नाही कारण प्रेम देण्याचा धर्म आहे हे कुणी त्यांना सांगितलेलेच नसते. तू माझी राधा मी तुझा कृष्ण म्हणणाऱ्या पिढीला प्रेमाचा त्याग अन त्याच कृष्ण भजनात दाह घेणारी मीरा समजली नाही, म्हणून ती नाही म्हटली कि मग …..आमच्यात शाहरूख घुसतो कि कि किरण ला माझी नाही तर कुणाचीच नाही सारखे कृत्य होते.
महाराष्ट्रातील हिंगणघाटात एक निष्पाप प्राध्यापक तरुणीला पेट्रॉल टाकून जीवंत जाळले त्या नालायक विकी नागराळे च्या मानसिकतेला सहज घेता येणार नाही. आपली नाही तर कुणाचीच नाही टाईप लोफर चौका चौकात आहेत , असिड फेकणे पेट्रोल टाकून जाळण्या पर्यंत सामाजिक सुरक्षा रसातळाला गेली आहे या पेक्षा अधिक चिंतेचा विषय म्हणजे आजच्या पिढीत प्रेमाची व्याख्या बदलून गेली आहे. मुलीचे मन वाचण्यापेक्षा तन न्ह्याहाळनारी पिढी ऑनलाईन आहे, काय पीस आहे असे म्हणत त्याच्या जिभळ्या नेहमी लाळ गाळत रोडवर कट मारत असतात, कोचिंग क्लासेस असो वा मग पाणी पुरी खाणारी जीन्स मधली ती पाहताना डोळ्याने तिच्यावर बलात्कार करणारा तरुण आता वाढतो आहे. मनाच्या अनुमोदनाने तनाचे समर्पण आणि त्यासाठीचा आवश्यक अवधी आता आजच्या पिढीकडे नाही. चिठ्ठी देताना नुसते बोटाला बोट लागले तर दोन दिवस नुसते बोट चाखणारा प्रियकर आता तोंड ओरबाडून खायला मागे पुढे पाहत नाही. प्रेम आणि भोग यांची सरळमिसळ करत प्रेमाचे त्रिकोण चौकोन कुणी कुणी तर शटकोण केले आहेत. यातूनच मग गुन्हे घडतात आणि हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या कळ्या जळताना पहाव्या लागतात.
पुरुषार्थाची ‘विकृती’ जेव्हा सक्षमीकरणाला चटका देते आहे , वातानुकूलित बसणाऱ्या सामाजिक संस्थांनी आता उन्हात उभं राहून पुरुष सत्ताक ‘मेंदूवर’ काम करणे गरजेचे आहे.महिला प्राध्यापिकेला सकाळी 7 वाजता भररस्त्यात रॉकेल टाकून पेटवून देण्याचा निंदनीय प्रकार घडला. प्रेमाची पातळी घसरली की मानसिकता ? सौन्दर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ? की नजरेला कीड लागली ? मुळात इतका घाण विचार डोक्यात येतोच कसा ? हा अधिक चिंता आणि चिंतेचा विषय आहे . एकतर्फी प्रेमाचे बळी या पूर्वी देखील गेलेले आहेत म्हणूनच प्रेम हि संकल्पना एक तर स्पष्ट झाली पाहिजे नाहीत दिलीप कुमार टाईप डोळ्यांचा प्रणय आनंद घेणारी रीत तरी पुनर्जीवीत झाली पाहिजे.
मागच्या पिढीत नायक नायिका पडद्यावर आले कि कैमेरावरती केला जायचा अन पक्षी दाखवले जायचे आता मात्र सर्व पडदे काढत नैतिकतेचा मर्डर केला जातोय. नव्या पिढीला भले हे मागास विचार वाटत असले तरी वाढत्या गुन्ह्याला हि लालसा देखील तेवढीच कारणीभूत आहे. प्रेमात त्याग वैगेरे पुस्तकात असतात बाकी वास्तवात एक कीस, एक भेट, एक रात्र आणि केवळ भोग म्हणजे प्रेम अशी व्याख्या करून बसलेला समाज वर्तमान जगत आहे. १२ वर्षाचे आळपाने सनीला एच डी आणि चड्डीत पाहत आहेत, वयाच्या या टप्प्यावर शारीरिक उन्माद अवतीभवती कृतीबध होतो अन नाहक लेकींना जळावे लागते. मुलींचा वाढता आत्मविश्वास नक्की कौतुकाचा विषय आहे मात्र याच वेळी धोक्याच्या कवेत जाण्यापासून तिने स्वतला वाचवले पाहिजे, सुरवातीला लोभस मधाळ वाटणारी आर्जवे केव्हा पाशवी होतात आणि सवयीची देखील बनतात हे समजून घेतले पाहिजे. आवडत्या मुलासोबत लग्न करून देण्याची परवानगी नव्या जगाचे सुलक्षण नक्की आहे मात्र तिचे आवडणे कुठल्या निकष मापदंडा वर निश्चित होते आहे याची काळजीच केली पाहिजे, सुंदर बाईक पाकीट भरलेला मुलगा चांगला प्रियकरच असतो असे कुणी सांगावे. आयुष्यातला एक क्षण एकदाच मिळतो त्यामुळे प्रेमासारखी अवीट भावना आपण जबाबदारीने जगली पाहिजे हे या पिढीला कळण्या अगोदर एकदोनदा प्रेम होऊन झालेले असते.
पिंक नावाचा चित्रपट आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी पाहिला असेल त्यातला राजवीर वर तापसी विश्वास ठेवते, पार्टीला जाते अगदी दारू देखील पिते मात्र तिने राजवीर ला लैंगिक संबधाला परवानगी दिलेली नसते मात्र अमिताभच्या समोर टकला वकील जे युक्तिवाद करतो, तो असा कि , ” मुलींनी मग रूम मध्ये का जावे ? समाज देखील असेच समजतो मात्र कुणी असे का विचारत नाही कि मुलीने तुमच्यासोबत बसण्यास संमती दिली याचा अर्थ असा अजिबात नसतो कि तरुणाने मुलीसोबत पुढे काही केलेच पाहिजे, मुलींना टोकराखाली झाकण्यापेक्षा पोरांना देखील नैतिक मर्यादेत समाजाने बसवले पाहिजे. स्त्री केवळ भोगली पाहिजे म्हणूनच मुलीची चक्क आई असलेल्या म्हणजे स्त्रीच्या कपाळाला आट्या पडतात. पोरी जन्माला घालायच्या, तारुण्यात राखायच्या अन जन्माची पुंजी खर्चून उजवायच्या. खरच या साठीच मुली होऊ द्यायच्या का ? मुलीला जन्माला घालणे म्हणजे दोष समजणारी पिढी अजून जिवंत आहे. मुलीला मुला प्रमाणे आमची व्यवस्था सन्मान देईल असे वाटत नाही मात्र किमान तिच्या भावना आणि तिला तिच्या बद्दलचे अधिकार तरी आम्ही दिले पाहिजेत. मी तिला आवडत नसेल तर मी तिचा नाद का सोडत नाही मी तिला आवडत नाही याचा अर्थ तिला दुसरा कुणी आवडू नये अशी अपेक्षा कशी करायची, बर मी आवडत नाही म्हणजे दुसरा कुणीतरी आपल्या सारखाच मुलगा असतो. म्हणजे पुरुष म्हणून सगळे सोबत राहणार मात्र मुलगी स्त्री म्हणून तिला स्वायत्त अधिकार नाहीत, तिने त्याची मर्जी सांभाळायची ? बाप भाऊ म्हणून मुली बहिणींना कपडे अंगभर घालण्याची अपेक्षाच या साठी करत असतात कि कमरेवर नजर ठेऊन तिथे अभिलाषा कल्पित करणारी पोर वाढली आहेत. स्वातंत्र आणि मर्यादातला अमर्याद संघर्ष आमच्या पिढीला करावा लागणार आहे. मुलींना जाळणे असिड फेकणे हि कृती कुठल्याही प्रेमाचे प्रतिक असू शकत नाही. प्रेम म्हणजे समोरच्याला सुखी पाहण्याचा धर्म मात्र तिला संपवून काय साध्य केले जाते? आम्हाला केवळ नेत्यांना कायद्याला पोलिसांना दोष देऊन चालणार नाही, आमचं बेन नेमके कसे वागते आणि वागले पाहिजे आम्ही त्याला कुठल्या संस्कारात आणि संस्कृतीत वाढवले आहे याची काळजी आता केली पाहिजे.