बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : जेव्हा एखादा हिटलर जन्माला येतो, सत्तेत बसतो तेव्हा त्याला सर्वाधिक जास्त भीती बुद्धीवाद्यांची असते, विद्यार्थ्यांची असते, म्हणूनच जेएनयूसह अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांंवर हल्ले होत आहेत. एनआरसीच्या माध्यमातून मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असून भाजपाच्या या हिटलरशाहीविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित या, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ते बीडमध्ये CAA, NRC विरोधात महासभेचे आयोजन केले होते. या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
आव्हाड म्हणाले, हा मुसलमान, हा हिंदू असा भेदभाव करू नका, सरकारच्या धोरणाविरोधात आता रान पेटलं आहे. माणुसकीचे मारक मोदी-शहा असून देशवासियांची लढाई आता सुरू झाली आहे. जिल्हाभरातून हजारो नागरिक संविधान बचाव महासभेसाठी छत्रपती संभाजी महाराज मैदानात एकवटल्याचे आज २९ जानेवारी रोजी दिसून आले. सीएए सह एनआरसी कायद्याविरोधात आक्रोश व्यक्त करत, इन्कलाब झिंदाबादचे नारे देत एनआरसी कायद्या विरोधात नागरिकांनी हल्लाबोल केला.
या महासभेसाठी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, मौलाना अबू तालिब रहेमानी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्या दिपसिता धार, आ. संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आ. राजेंद्र जगताप, माजी. आमदार बदामराव पंडीत, माजी आ. सुनिल धांडे, माजी आ. सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, माजी आ. सिराजोद्दन देशमुख, सुशिलाताई मोराळे, कॉ. नामदेव चव्हाण, मोईन मास्टर, राजेश घोडे, अशोक हिंगे, मोहन जाधव सह आदी मान्यवर उपस्थित होते.