पुणे : डॉल्बीबाबत न्यायालयाचे जसे निर्णय आहेत तसेच यामुळे होणा-या आरोग्यविषयक समस्या आहेत. निर्णयाविरोधात डॉल्बी लावली तर गुन्हे दाखल करावे लागतील. कोल्हापूरमध्ये आम्ही जनजागृतीतून हा प्रश्न सोडविला. विसर्जनाला रात्रभर वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सध्या केली जात आहे. याबाबत माझे बोलणे व कायदेविषयक चर्चा सुरु असून मंडळांना समाधान वाटेल, असा मार्ग आपण काढू, असा विश्वास पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडला. यावेळी खासदार गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, नगरसेवक हेमंत रासने, अजय खेडेकर, प्रविण चोरबेले, सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेह सूर्यवंशी आदी उपस्थित होते. नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. मंडळाला ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १५६ मंडळांपैकी ९८ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून ट्रस्टच्या वतीने एकूण १२ लाख ६ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजाच्या विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढलेला असताना गणेशोत्सवाप्रमाणे इतरही उत्सवात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. यामुळे उत्सवात व कामात सुसंस्कृतपणा वाढेल. गणपतीच्या निमित्ताने एकत्र आलेला कार्यकर्त्यांचा गट असून त्या गटाने वर्षभर कार्य करीत अडचणी सोडविण्यास मदत केल्यास पुण्यातील अनेक प्रश्न सुटतील. सध्या लोकांची पोटाची भूक भागत चालली आहे. आता मनाची व बुद्धीची भूक वाढत आहे. त्यामुळे व्याख्याने, गाणी, स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम मंडळांनी वर्षभर राबवायला हवे.
गिरीष बापट म्हणाले, मंडळाने गणपती उत्सव कसा साजरा करावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे दगडूशेठ, मंडई यांसह आजूबाजूची मंडळे आहेत. चांगले काम इतर मंडळांनी करावे, याकरीता दगडूशेठ गणपती ट्रस्टने उत्तेजन दिले. गणेशोत्सव ही एक चळवळ असून त्यातून ज्येष्ठांपासून लहानांपर्यंतचे प्रबोधन होते. ज्या अडचणी असतील, त्या आपण सोडवित असतो. पोलिसांचे सहकार्य व्यवस्थित असते, नसेल तेथे आपण करुन घेतो. यामुळे हा आनंदाचा क्षण उत्सवाच्या माध्यमातून अनुभवत असतो. शासनाकडून काही कमी पडणार नाही. जे सरकारच्या हातात आहेत, त्यासाठी सरकार आपल्या पाठीमागे उभे राहिल.
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुढील वर्षी गणेशोत्सवापूर्वी आधी तीन महिने आपल्याला परवानग्या व अडचणींविषयी सर्व तयारी करायला हवी. तरच हा उत्सव अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, गणेशोत्सवात सात दिवस मंडळांचे देखावे रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मी मागील आठवडयात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत केली आहे. आपण विसर्जन मिरवणूक वेळेवर संपवायचा आदर्श घालून द्यायला हवा. रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनेक मंडळांना एका जागी बसावे लागते. त्यामुळे पारंपरिक वाद्य वाजवून मंडळे पुढे गेल्यास मिरवणूक वेळेत संपेल.
अण्णा थोरात म्हणाले, गुजरातच्या धर्तीवर दहा दिवस विशेष बाब म्हणून रात्री १२ वाजेपर्यंत देखावे सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. अनेक ठिकाणी रात्री १० नंतर शांतता होते. गुजरातला नवरात्रीत दहा दिवस परवानगी दिली जाते. त्यामुळे पुण्यात देखील दहा दिवस रात्री १२ वाजेपर्यंत आणि विसर्जन मिरवणूक सुरु झाल्यानंतर संपेपर्यंत परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.
अंकुश काकडे म्हणाले, सरकार नेमके कसे पाठीमागे आहे, हे आम्हाला समजत नाही. मंडळे व कार्यकर्त्यांवरील काही गुन्हे तसेच आहेत. त्यामुळे यावर्षी हे गुन्हे मागे घेण्याविषयी चांगली सुरुवात सरकार करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच शेवटचे सलग सात दिवस रात्री १२ पर्यंत देखावे सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अशोक गोडसे म्हणाले, कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे उद्धवस्त झालेले संसार उभे करण्याकरीता ट्रस्ट पुढकार घेत आहे. त्याकरीता आम्ही १० कोटी रुपयांचा निधी देणार आहोत. त्यातून एक गाव दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेमंत रासने म्हणाले, गेली अनेक वर्षे उत्तम सुरु असलेल्या उत्सवाला रात्री १० वाजेपर्यंत मर्यादा आहे. त्यामुळे आता सलग सात दिवस रात्री १२ पर्यंत देखावे पाहण्यासाठी परवानगी मिळावी. तसेच विसर्जन मिरवणूक थाटात व्हावी, याकरीता संपूर्ण मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना संपूर्ण वेळ परवानगी मिळावी. यामुळे मिरवणूक ही अखंडपणे सवाद्य सुरु राहिल, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
स्पर्धेच्या परीक्षण मंडळात डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, पराग ठाकूर, अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, सुरेश वरगंटीवार, गजानन सोनावणे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांसह सहाय्यक म्हणून बाळकृष्ण घाटे, लिंगराज पाटील, शुभम साळुंके, सौरभ साळेकर, दीप राणे यांनी काम पाहिले. हेमंत रासने यांनी प्रास्ताविक केले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.