मुंबई | मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्ष होत असल्यामुळे मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का? अशी संतप्त विचारणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
मराठा क्रांतिमोर्चाच्या आजच्या मुंबईतील संवाद यात्रेच्या अनुषंगाने काल रात्रीपासून राज्याच्या विविध भागात पोलिसांनी मराठा आंदोलनाच्या समन्वयकांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली होती. आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी मुद्दा उचलला. त्यावर उत्तर देताना सरकारने मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत असल्याने शहराची परिस्थिती संवेदनशील होती व त्यामुळे मराठा आंदोलकांना अटकाव केल्याचे सांगितले. त्यानंतर आरक्षण व दुष्काळाच्या मुद्यांवर सभागृहात प्रचंड गोंधळ कामकाज तहकूब करावे लागले.
सभागृह स्थगित झाल्यानंतर विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मुंबई हल्ल्याला १० वर्षे होत आहेत म्हणून मराठा आंदोलकांना रोखण्यात काहीच अर्थ नव्हता. मराठा क्रांतिमोर्चाने आजवर जगाच्या इतिहासात नोंद होतील असे ५८ विशाल मोर्चे अतिशय शांततेने काढले. अशा आंदोलकांपासून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण व्हायला ते अतिरेकी नाहीत. केवळ मराठा समाजाचा आवाज दाबण्यासाठी आणि आपली निष्क्रियता लपविण्यासाठी सरकारने मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखले, असा आरोप करून विखे पाटील यांनी या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध केला.