मुंबई | मराठा आरक्षण मंजूर झाल्यामुळे आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. परंतु ही वेळ श्रेयवादाची नाही तसेच जल्लोष करण्याची नाही. आरक्षणासाठी ४० जणांनी आपला जीव दिला, त्यांचं बलिदान लक्षात ठेवा, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज मी फेटा बांधला नसल्याचे म्हणत विधानभवनात आरक्षणाचा जल्लोष साजरा करण्यासाठी फेटा बांधलेल्या भाजपा नेत्यावर अजित पवार यांनी निशाणा साधला. अजित पवारांनी आझाद मैदानात जाऊन मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी आम्ही गेल्या ८ दिवसांपासून तगादा लावला होता. त्यामुळेच, आम्ही सभागृह चालू दिलं नाही. आज मराठा समाजाच्या आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं. मात्र, २८८ आमदारांनी एकमताने हे विधेयक पास केलं आहे. त्यामुळेच, आरक्षणाची मागणी पूर्णत्वाला गेली, असे म्हणत या आरक्षणाचे श्रेय सर्वांचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
आंदोलनावेळी मुलांवर झालेल्या केस मागे घेण्याची मागणी आम्ही केली आहे. ज्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वत:चा जीव दिला, त्यांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, अद्याप ती मदत मिळाली नसून ती लवकरात लवकर मिळावी, अशीही मागणी केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.