कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर : महापालिका सभेत असभ्य वर्तन करणारे ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमालाकर भोपळे कारवाईच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. गटनेते सत्यजित कदम यांनी त्यांच्याकडून शुक्रवारी लेखी खुलासा मागवला आहे. तसेच भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करणार आहेत. त्यामुळे भोपळे यांच्यापुढील समस्या वाढण्याची शक्यता आहे.
गुरुवारी (ता. ३०) महापालिकेची विशेष सभा झाली. सभेत ताराराणी आघाडीचे नगरसेवक भोपळे काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जाऊन बसले. सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना त्यांनी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांचे चुंबन घेतले. त्याचे जोरदार पडसाद शहरात उमटले. त्यांच्या या असभ्य वर्तनामुळे अनेक महिला सदस्यांना मान खाली घालावी लागली. सभागृहात यापूर्वी अनेकदा भोपळे यांनी विविध मार्गाने स्टंटबाजी केली आहे.
अनेकवेळा विरोधी आघाडीच्यावतीने त्यांना वेळोवेळी समजही देण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नसल्याचे गुरुवारच्या सभागृहातील प्रकारावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे धोरण ताराराणी आघाडीने घेतले आहे. त्यासाठी गटनेते कदम यांनी दोन दिवसांत सभागृहातील वर्तनाबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विरोधी आघाडी भोपळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आयुक्तांची भेट सोमवार (ता. ३) घेणार आहेत. त्यामुळे सभागृहातील वर्तन भोपळे यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.