महाराष्ट्रातील मंगरूळपीरचा ‘सेंद्रीय खपली गहू’ वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सतिश शिंदे

वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरचा ‘सेंद्रीय खपली गहू’ राजधानी दिल्लीत आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये विक्रीसाठी आणण्यात आला आहे. यासह सेंद्रीय (organic) पद्धतीने तयार केलेले बंसी गहू, तांदुळ, हळद, डाळी, मसाले, तेलबिया, चिप्स, बॉडी लोशन, लीप बाम, कपडे, गृह सजावटीच्या वस्तू ऑरगॅनिक मेळाव्यात प्रदर्शित केलेल्या आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज केले.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात आले. या मेळाव्याची सुरूवात आजपासून झाली असून या मेळयात 250 पेक्षा अधिक महिला उद्योजिकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महिला उद्योजिकांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबादमधून सानंद फुडच्या आरती डुघ्रेकर या आलेल्या आहेत त्यांच्या दालनात तूर, मूग,चणा, उडीद डाळ, हळद, लाल मिरची पावडर आहे. राज्यातील सेंद्रीय शेती करणारे अनेक शेतकरी समूह त्यांच्यासोबत जोडलेले आहेत. दिल्लीमध्ये येण्याचे त्यांचे पहिले वर्ष असून सेंद्रीय शेती करणाऱ्यांना यामाध्यमातून संधी मिळू शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या गायत्री राऊत यांचे दिल्लीत ऑरगॅनिक मेळाव्यात येण्याचे दुसरे वर्ष आहे. त्यांच्या स्टॉलवर जवस, डाळी, मुगाच्या डाळीच्या वड्या आहेत. त्यांनाही या ऑरगॅनिक प्रदर्शनातून बरीच अपेक्षा आहे. यासह राज्यातील नंदुरबार, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बीड, मुंबईसह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॅनिक फार्मस यांचीही दालने याठिकाणी आहेत.
या मेळव्यात सहभागी झालेल्या महिला उद्योजिका देशातील सर्वच राज्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेल्या आहेत. ऑरगॅनिक वस्तुंच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, महिलांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या मेळव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याठिकाणी दैनंदिन वापराच्या, गृहोपयोगी सर्वच वस्तुंचे प्रदर्शन मांडले असून याच्या वापराने आरोग्यावर कोणताही दुष्यपरिणाम होत नसून हे आरोग्याला हितकारकच आहे. मागील चार वर्षांपासून या ऑरगॅनिक मेळव्याचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी मेळाव्यात सहभागी महिला उद्योजिकांच्या आर्थिक लाभात वाढ होत असते, यंदाही लाभ होईल, अशी अपेक्षा सहभागी महिलांनी व्यक्त केली. याठिकाणी नामांकित उद्योगसमुहांना बोलावून त्यांच्याशी महिला उद्योजिकांशी चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. जेणेकरून महिला उद्योजिकांना ऑरगॅनिक वस्तू विक्रीच्या क्षेत्रात आणखी संधी मिळू शकेल.

या ऑरगॅनिक मेळाव्यामध्ये औषधीयुक्त काळे तांदुळ, पारपांरिक तांदुळ, तेलबिया, केळीचे चिप्स, आचार, नागलीचे विविध खाद्य पदार्थ, चिक्की, बेसनाचे लाडू, अंबाडी, गवती चहा, तरोटा कॉफी, बेबी बॉडी वॉश, बॉडी क्रिम, लीप बाम, मालीश तेल, हॉन्डवॉश, कपडे, गृह सजावटीच्या वस्तू आदि विविध वस्तू तसेच पदार्थ येथे विक्रीसाठी प्रदर्शित केलेले आहे.

या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना आर्थिक बळकटीकरण करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री यांनी यावेळी केले. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यत राहणार असून हे प्रदर्शन नि:शुल्क आहे.

Leave a Comment