रत्नागिरी प्रतिनिधी | जनसुविधा, नागरी सुविधा व यात्रास्थळ योजनेंतर्गंत मंजूर झालेल्या अनेक कामांना महाविकास आघाडीने स्थगिती दिली आहे. राजापूर तालुक्यातील वर्क ऑर्डर नसलेल्या पंचवीस कामांना याचा फटका बसला आहे. आघाडी सरकारच्या या निर्णयाबाबत जनतेत नाराजी वाढत आहे.
२०१९-२० या वर्षामध्ये जनसुविधा, नागरी सुविधा आणि यात्रास्थळ योजनेतून राजापूर तालुक्यातील ४६ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी शासनाकडून सुमारे ३ कोटी २५ लाख रूपयांचा निधीही मंजूर झाला. मंजूर झालेल्या कामांपैकी २१ कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी १८ कामांना कायार्रंभ आदेश देऊन ती कामे सुरू झाली. त्यापैकी सद्यस्थितीमध्ये सहा कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर काही रस्ते वा अन्य काही विकासकामांना शासनाने स्थगिती दिली. त्यानुसार, ७ फेब्रुवारी२०२० च्या आदेशान्वये नागरीसुविधा, यात्रास्थळ आणि जनसुविधा योंजतर्गंत कायार्रंभ न झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.
त्याचा फटका मंजूर झालेल्या ४६ पैकी २५ कामांना बसला आहे. स्थगिती मिळालेल्या कामांपैकी बहुतांश कामांच्या निविदा ग्रामपंचायत स्तरावरून प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, निविदा मंजूर झालेल्या ठेकेदाराला कामाच्या कायार्रंभ आदेश ७ फेब्रुवारी २०२० पूर्वी देण्यात आलेला नसल्याने त्यांना स्थगिती देण्यात आले आहेत. स्थगिती मिळालेल्या कामामध्ये आगामी काळात पंचवार्षिक निवडणुका होणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींतील कामांचा समावेश आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक गावांमधील स्थानिक नेते, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी लोकांना निवडणुकीपूर्वी विकासकामे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना मिळालेली स्थगिती आणि ती कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता पाहता आश्वासन देणारे अडचणीत आले आहेत.