पालघर प्रतिनिधी। बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या संजय गुप्ता नामक इसमाला पालघर भाजी मार्केट येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन भाजी विक्रेत्यांना त्याने 100 रूपयांच्या नोटा देवून गंडा घातला आहे. काल रात्री उशिरा हा प्रकार घडला. सदर व्यक्ती भाजी मार्केट परिसरात फिरत असून अनेक वेळा त्याने या बनावट नोटा देऊन भाजी विक्रेत्यांना गंडवले आहे. या प्रकरणात लाखो रूपयांच्या बनावट नोटा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान मार्केट मधील लक्ष्मीबाई शिरसाठ या वृद्ध महिलेला शंभर रुपयाची नकली नोट भाजी घेण्यासाठी दिली होती. या महिलेला संशय आल्यानंतर तिने आपला मुलास शंभर रुपयांची नोट दाखवली. ती नोट बघितल्या नंतर खोटी आहे याचा अंदाज आल्यानंतर ती पोलिसांच्या ताब्यात दिली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने याबाबत पाऊले उचलत संशयिताला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतले असता तपासणी अंतर्गत त्याच्याकडे 100,200,500,च्या अनेक बनावट नोटा आढळून आल्या. 15 दिवसांआधी गुप्ता याने याच बाजारात शंभर रुपयाच्या अशा अनेक नोटा बदलल्या असल्याचे सांगितले जाते. या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत.