मोदींनी दिला ‘फिटनेस मंत्र’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला. या वेळी त्यांनी फिट इंडिया चळवळ ही जनआंदोलन बनले पाहिजे, असे आवाहन देशातील जनतेला केले. आपण आपल्या फिटनेसबाबत उदासिन होत चाललो असल्याची खंतही पंतप्रधानांनी व्यक्त केली. फिटनेस ही आता काळाची गरज बनली असून, फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने आता पाऊल उचलले आहे, असे मोदी म्हणाले.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर फिट इंडिया चळवळीचा शुभारंभ करताना मोदी म्हणाले की, ‘आजकाल आपण तंत्रज्ञानावर विश्वास टाकून जगू लागलो आहोत. फिटनेस हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. काळासोबत चालत असताना फिटनेसबाबत आपल्या समाजात एक उदासिनता आलेली आहे. मात्र फिटनेसला एक उत्सवाच्या रुपात साजरा करण्याची आवश्यकता आहे’. फिटनेससाठी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांवर टिप्पणी करताना पंतप्रधानांनी, ‘आजकाल आम्ही चालतो कमी, मोजतो अधिक’, असा टोलाही लगावला.

तंत्रज्ञान आज आपल्याला मोजून सांगते की आपण किती पावले चाललो. मोबाइलद्वारे पावलं मोजली जात आहेत. काही लोक तर नेहमीच्या कामात इतके गुंतलेले आहेत की, त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. तर, काही लोक भरपूर खाऊन डायटिंगवर चर्चा करत असतात.

काही लोक घरात व्यायामशाळा सुरू करतात, मात्र तिच्या साफसफाईसाठी नोकर ठेवतात,असे म्हणत त्यांनी लोकांच्या व्यायामाप्रति असलेल्या उदासिनतेकडे बोट दाखवले. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ‘मधुमेह, उच्च रक्तदाब हे जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत. जीवनशैली चुकीची असल्या कारणाने हे आजार निर्माण होत आहेत. जीवनशैली योग्य असेल तर आजार होणार नाहीत. जीवनशैलीत बदल केल्यास आजारही दूर होतील. या बदलाचेच नाव आहे ‘फिट इंडिया चळवळ’. हा बदल केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण जगात होत आहे.’

Leave a Comment