पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण परीक्षार्थींना अद्यापही सेवेत रुजू करून न घेतल्याबद्दल या ‘भावी अधिकाऱ्यांनी’ पुण्यातील विधान भवनासमोर शुक्रवारी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. तब्बल ८०० ते १००० भावी अधिकाऱ्यांचा यात समावेश असून राज्यसेवेसोबत सहायक मोटार वाहन निरीक्षक शिफारसपात्र हे उमेदवार मागील १६-१८ महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने अद्यापही पदावर रुजू करून न घेतल्याने अनेकांचे जगणे अडचणीत आले आहे.
वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी पुणे स्टेशनजवळील महात्मा गांधी पुतळा ते विधानभवन परिसरात रॅली काढली. पालथं होऊन दंडवत घालत यावेळी अधिकाऱ्यांनी सरकारला नियुक्तीसाठी विनवणी केली. शुक्रवारपासून विधानभवन येथे सुरू झालेल्या भीक मांगो आंदोलनाला व बेमुदत उपोषनाला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असून गुणवत्ता सिद्ध करूनही असे हाल होणार असतील तर परीक्षांचा अभ्यास करायचा का नाही हा संतप्त सवालही विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.