डोक्याला खुराक | मयूर डुमणे
माणूस हा सामाजिक प्राणी आहे तसा तो राजकीय प्राणी देखील आहे. राजकारणात माणसाला पूर्वी पासूनच खूप रस आहे. असं एकही ठिकाण नाही जिथं राजकारणावर चर्चा होत नाही. चार माणसं एकत्र आली की हमखास राजकारणावर चर्चा घडून येतेच. सोशलमीडियावर तर सर्वाधिक चर्चा राजकारणावरच घडून येते. ही चर्चा सुरू झाली की मग त्यात राजकीय पक्ष आले, विचारधारा आल्या. डावे-उजवे हे तर ठरलेलंच. अमुक नेता, व्यक्ती डाव्या विचारधारेची आहे तमुक नेता, व्यक्ती उजव्या विचारधारेची आहे, असं आपण सहज बोलून जातो. अशी चर्चा चालू असताना हे डावे उजवे नेमकी भानगड काय असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय का? नाही ना. तर चला आपण आता या प्रश्नाचं उत्तर शोधुया.
फ्रान्समधील सामान्य जनतेकडून संविधानाची मागणी – फ्रान्समध्ये 1789 साली झालेल्या क्रांतीनं डावं आणि उजवं या जगप्रसिद्ध संकल्पनांना जन्म दिला. 1789 मध्ये 17 जुलैपासून फ्रान्समध्ये क्रांतीला सुरवात झाली होती. या काळात राज्याची आर्थिक स्थिती खराब होती. राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्यामुळे जनतेला जीवनावश्यक सोयी सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. यामुळे जनतेमध्ये असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली होती. याच संकटाचा सामना करण्यासाठी 1789 च्या मे-जून मध्ये तत्कालीन राजा 16 व्या लुईने एका सभेचं आयोजन केलं होतं. तेव्हा राज्यात नागरिकांचे तीन वर्ग होते. एक वर्ग जमीनदारांचा, दुसरा उमरावांचा आणि तिसरा सामान्य जनतेचा. हे तिन्ही वर्ग या सभेला उपस्थित होते. या सभेत तिसऱ्या वर्गातील म्हणजे सामान्य जनतेने राज्यासाठी संविधानाची निर्मिती करण्याची मुख्य मागणी केली. या मागणीला राजाचे समर्थक असणाऱ्या इतर दोन्ही वर्गांनी कडाडून विरोध केला. सभेच्या तीन दिवसानंतर तिसऱ्या वर्गातील लोकं संविधानाची मागणी करण्यास सभेला गेले तर त्यांना सभेत प्रवेशच नाकारण्यात आला.
लढाईचा निर्धार – यामुळे तिसऱ्या वर्गातील लोकांना फार मोठा धक्का बसला. त्यांनी राजाच्या या कृतीला जोरदार विरोध करण्याचे ठरवले. ते राजाच्या महालाजवळील टेनिस कोर्टमध्ये एकत्र आले. टेनिस कोर्टवर जमलेल्या सर्वांनी सोबत राहून राजा विरुद्ध लढाई करण्याचा निश्चय केला. संविधानाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लढाई सुरू ठेवण्याची त्यांनी शपथ घेतली. मोठ्या संख्येने घेतलेली ही शपथ ‘टेनिस कोर्ट ओथ’ या नावाने प्रसिद्ध आहे. या दरम्यान पहिल्या व दुसऱ्या वर्गातील काही लोकही या लढाईत सहभागी झाले.
संविधानाची निर्मिती – शेवटी या मागणीपुढे राजा आणि त्यांच्या समर्थकांना झुकावे लागले. राजाला संविधानाच्या निर्मितीस परवानगी द्यावी लागली. संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या सभेत सर्व वर्गातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. या सभेने दोन वर्षे काम करून 9 जुलै 1791 ला संविधान सादर केले.
येथेच जन्मली डावी उजवी संकल्पना
आता संविधानानुसार बैठक सुरू झाली. या आधी राजाच्या अध्यक्षतेखाली घोड्याच्या नाल आकारात बैठक होत होती. पण आता बैठकीचा अध्यक्ष राजा नव्हता. त्यामुळे बैठकीची पद्धतही बदलण्यात आली. आता बैठकीत अध्यक्षांच्या डाव्या बाजूला तिसऱ्या वर्गातील क्रांतिकारी लोक बसले आणि उजव्या बाजूला सत्ताधाऱ्यांचे समर्थन करणारे आणि कठोर बदलाला विरोध करणारे लोक बसले.
कालांतराने डाव्या बाजूला बसणाऱ्या लोकांना लेफ्टीस्ट आणि उजव्या बाजूला बसणाऱ्या लोकांना राईटीस्ट बोलले जाऊ लागले. अशा पद्धतीनं डावे आणि उजवे या संकल्पनांचा जन्म झाला. फ्रान्समध्ये या संकल्पना प्रचलित झाल्या.
फ्रान्समध्ये जन्मलेल्या या संकल्पनांना हळूहळू इतर देशांतही मान्यता मिळू लागली. परिवर्तनाची बाजू घेणाऱ्या लोकांना लेफ्टीस्ट बोलले जाऊ लागले आणि जे लेफ्टीस्ट विचारधारेचं समर्थन करत नाहीत त्यांना राईटीस्ट बोलले जाऊ लागले.
वेगवेगळ्या देशांत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं या संकल्पना स्वीकारण्यात आल्या. हळूहळू गरीब, शेतकरी, कामगार या वर्गाने लेफ्ट ग्रुपचे समर्थन केले.
प्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्सने 1848 साली जेव्हा आपले विचार जगापुढे मांडले तेव्हा या संकल्पना खूपच प्रसिद्ध झाल्या. मार्क्सच्या विचारधारेचं म्हणजे कम्युनिजमचं समर्थन करणाऱ्या सर्व संघटनांना लेफ्टीस्ट बोलले जाऊ लागले. फ्रान्सच्या क्रांतीतून जन्मलेल्या ही संकल्पना अमेरिकेसह इंग्लंडमध्येही पोहोचली. भारतातही डावे आणि उजवे या संकल्पना प्रचलित झाल्या.
तर अशी आहे ही डावी आणि उजवी भानगड !