राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही सरकारनं केलं आहे. दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये मास्कची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यामुळं राज्यामध्ये मास्कचा तुटवडा निर्माण होणार नाही याबद्दल काळजी घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक अभिनव कल्पना राबवली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्यातील अनेक मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांकडून मास्क निर्मिती करुन घेतली जात आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत (डीजीआयपीआर) ट्विटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. डीजीआयपीआरने औपचारिक ट्विटवर हॅण्डलवरुन मास्क बनवणाऱ्या कैद्यांचा फोटो ट्विट केले आहेत. “करोनाच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमधील बंद्यांद्वारे मास्क निर्मिती सुरू करण्यात आली आहे,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यामध्ये मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईतील मलाबार हिल परिसरातील तिनबत्ती चौक येथील केमिस्ट स्टोअरवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शिंगणे यांनी केमिस्ट स्टोअरवर चढ्या भावाने सॅनिटायझरची विक्री केली जात नाही ना याची प्रत्यक्षात आढावा घेतला. तसेच स्टोअरमध्ये उपलब्ध सॅनिटायजरमधील घटक योग्य असल्याचे तपासले. ग्राहकांच्या बिलावरील रक्कम एमआरपीपेक्षा जास्त नसल्याची खात्री शिंगणे यांनी यावेळी करुन घेतली.

सध्या सॅनिटायजर, मास्क यांची मागणी वाढली. ग्राहकांना मागणीनुसार हॅन्ड सॅनिटायजर, मास्क उपलब्ध करून द्या. ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या. आपल्या दुकानात मुबलक प्रमाणात चांगल्या दर्जाचे उत्पादन ठेवा, योग्य किंमतीतच ते विका अशा सूचनाही शिंगणे यांनी दुकानदारांना दिल्या आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment