टीम हॅलो महाराष्ट्र : रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नसून राजमाता जिजामाताच शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू आहेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले. शरद पवारांच्या या विधानानंतर सोशलमीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय. त्या फोटोमध्ये शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची एकत्रित मूर्ती दिसून येत आहे. या फोटोमध्ये शिवाजी महाराज रामदास स्वामींचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. हे एक स्मारक असून या स्मारकाचे उदघाटन स्वतः शरद पवारांनीच केले आहे. 26 एप्रिल 1990 रोजी शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते या स्मारकाचे उदघाटन झाल्याची नोंद स्मारकाच्या कोनशिलेवर करण्यात आली आहे. हे स्मारक नेमके कुठे आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र आता या व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे विरोधक शरद पवारांवर निशाणा साधत आहेत.
शिवाजी महाराजांची उपाधी ही छत्रपती ही होती. जाणता राजा ही उपाधी रामदास स्वामी यांनी जन्माला घातली. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच. शिवाजी महाराजांच्या गुरू या राजमाता जिजामाता या होत्या, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. ते सातारा जिल्ह्यातील माण खटाव प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या साखरेच्या पोत्यांचे पूजन प्रसंगी बोलत होते. उदयनराजे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. सत्तेत असलेल्या सो कॉल्ड जाणत्या राजांना ही उपाधी कोणी दिले हे मला माहिती नाही, अशी टीका उदयनराजेंनी केली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी वरील मत मांडले.