सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. यात्रेचे आगमन झाल्यानंतर आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाच्या मिरवणुकीत न दिसलेले चित्र सर्वाना पहायला मिळाले. यात्रे दरम्यान मोठया संख्येने कार्यकर्ते भगवे कपडे परिधान करून तसेच भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते. त्यामुळे पुरोगामी पक्षाचा बालेकिल्ला भगवा झाला अशी चर्चा रंगत आहे.
संपूर्ण सातारा शहरातून आलेल्या जनादेश रॅलीला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले आहे. सातारा सैनिक स्कूलच्या प्रांगणावर सायंकाळी सव्वा सहा वाजता यात्रेचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उदयनराजे भोसले , शिवेंद्रराजे भोसले, खासदार संजय काकडे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर, कांताताई नलावडे, आमदार बाळासाहेब भेगडे, नगराध्यक्ष माधवी कदम, डॉ. दिलीप येळगावकर, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार उपस्थित होते .