रास्ता गेला खड्ड्यात !!! २५ वर्षांपासून बुलडाण्यातील गिरणी गावाची खड्डे कहाणी..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा प्रतिनिधी ।  महाराष्ट्रात सध्या सर्वत्र खड्डे पुराण सुरु आहे. एक वेळ शहरातील रस्त्यांची प्रशासन कशी-बशी बोळवण तरी करते मात्र ग्रामीण भागाला सावत्र वागणूक मिळते. अशीच वागणूक गेल्या २५ वर्षांपासून एका गावाला मिळत आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील गिरणी हे एक गाव. पण गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी गावाने चकचकीत रस्ता पाहिला नाही आहे. रस्त्याच्या असुविधेमुळे या गावातील नागरिकांना चक्क खड्डे व चिखल तुडवित तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.

गेल्या 25 वर्षापासून या भागातील एकूणच चित्र पाहिलं तर नेमकं लोकप्रतिनिधी करतात काय? हा प्रश्न उभा राहिल्याशिवाय राहत नाही. बर ग्रामीण भागात एकूणच प्रशासनाचा कारभार पाहता खूपच ‘टॉप क्लास’ रस्ते बनवावेत अशी काही ग्रामस्थांची अपेक्षा नसतेच. मात्र त्यांना व्यवस्थित ये जा करता येईल असा रस्ता असला तरी ते खुश असतात. पण दुर्दैव हे की त्यांना तसे रस्तेही धड मिळत नाहीत. गिरणी गाव हे तर त्याचा दाखलाच आहे.

मागील २५ वर्षापासून गिरणी ग्रामस्थ रस्त्यासाठी प्रशासनाकडे सतत मागणी करीत आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांना इतके वर्ष नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की, रस्त्याकडे पाहिलं तर नेमकं रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. शालेय विद्यार्थ्यांना हाच चिखल तुडवत तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पायी जावे लागते, दळणवळनाची व्यवस्था नसल्याने सर्वांचीच हेळसांड़ होताना दिसत आहे खड्डेमय रस्ते असल्याने महामंडळाची बससेवा सुद्धा बंद आहे. राज्यात विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे अनेक नेते आता घरापर्यंत मत मागण्यासाठी येताना रस्त्यातील खड्डे सामोरे जावेच लागेल. किमान निवडूणुकीनंतर लाजेखातर तरी लोकप्रतिनिधींनी आता हा रस्ता दुरुस्त करावा हीच अपेक्षा गिरणी ग्रामस्थ लावून आहेत. तेव्हा प्रशासनाने गिरणी ग्रामस्थानच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा.

Leave a Comment