ऑकलंड | छोट्या मैदानावर तुम्ही कितीही धावा कुटल्या तरी आमच्याकडे एक से बढकर एक चेसिंग मास्टर आहेत हे भारतीय क्रिकेट संघाच्या यंग ब्रिगेडने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला.
भारताच्या विजयामध्ये लोकेश राहुलचं अर्धशतकासोबत विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांच्या छोट्या पण उपयुक्त खेळ्यांचा मोठा वाटा राहिला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ गडी बाद २०३ धावा केल्या. यामध्ये कॉलिन मुनरो, रॉस टेलर आणि केन विल्यम्सन यांनी अर्धशतकी खेळी केली.
या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी डाव सांभाळत मजबूत भागीदारी केली आणि १० व्या षटकापूर्वीच संघाचं शतक फलकावर लावलं. कोहली आणि राहुल बाद झाल्यानंतर मनीष पांडे 14 आणि श्रेयस अय्यर 58 यांनी पुढील डाव सांभाळत संघाला विजय मिळवून दिला. अय्यरने तर पांडेने धावा केल्या.