पुणे | आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आजचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे. रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं
आज भाऊ-बहीणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे. अशात या सणावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे आज अनेकांना रक्षाबंधन साजरं करता येणार नाही. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्था कामाला लागली आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कामगार हे गेल्या कित्येक महिन्यांपासून काम करत आहे. त्यामुळे आपली रक्षा करणाऱ्या खऱ्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करण्यासाठी रोहित पवार हे आज रुग्णालयांची भेट घेत आहेत.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ-बहिणीचं अतूट नातं रक्षाबंधनाच्या धाग्यांनी अधिक घट्ट करणारा हा सण आपल्या सर्वांच्या घरात आनंद, चैतन्य, उत्साह घेऊन घेईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.