नांदेड प्रतिनिधी | नांदेडमध्ये महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणाऱ्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षकच भक्षक झाल्याने विश्वास कोणावर ठेवायचा अशा संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. तर जागतिक महिला दिनी निर्भया वॉक काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नांदेड पोलीस दलाचा या प्रकरणामुळे फज्जा उडाला आहे. जागतिक महिला दिनाच्या एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील एका विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने ती दवाखाण्यात जाण्यासाठी निघाली होती. ती दवाखान्यात जात असताना भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नितीन केंद्रे यांनी या विद्यार्थिनीची आधी फ्लाईंग किस देत छेड काढली.
त्यानंतर तिचा रस्ता रोखून धरला. तिच्याशी अश्लील चाळे करत उद्धट वर्तन केले. हा प्रकार पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले खरे मात्र ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ या उक्तीचा येथे प्रत्यय आला. ग्रामीण पोलिसांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दमदाटी करणे, मारहाण करणे त्यांना पोलीस व्हॅनमध्ये कोंबून ठाण्यापर्यंत आणणे असा विचित्र प्रकार घडला. तर दुसरीकडे गुन्हेगार पोलीस कर्मचारी दबंग गॉगल लावून हातात सिगारेट धरून जणू आपण कोणताही गुन्हा केला नाही अशा आविर्भावात उभा होता.
आरोपीला बेड्या ठोकण्या ऐवजी ग्रामीण पोलीस मात्र त्याच्या दबंगगिरीकडे कौतुकाने पाहत होते अशी परिस्थिती घटनास्थळावर होती. कायद्याचे रक्षकच भक्षक बनत असल्याने न्याय कुणाकडे मागायचा ? रक्षणाची जबाबदारी कोणावर टाकायची ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.