नवी दिल्ली । संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत 5 खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. कोरोनामुळे सध्या सभागृहांचे कामकाज रोज केवळ ४ तास चालणार आहे. दरम्यान, आज कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या तब्बल 17 खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. यापैकी सर्वाधिक खासदार भाजपचे असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाच्या १२ खासदारांचा समावेश आहे. तर वायएसआर काँग्रेसच्या 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदाराला कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात आरोग्याच्या अधिक दक्षता घेतानाचे चित्र दिसले.
खासदरांपसोबत केंद्रीय मंत्र्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत असून त्यातील काही मंत्र्यांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत. अधिवेशन सुरू होण्याच्या ३ दिवस आधी खासदारांना कोरोना चाचणी करून घ्यावी, असे त्यांना सांगण्यात आले होते. अधिवेशना आधीची सर्वपक्षीय बैठक कोरोना साथीमुळे यंदा रद्द करण्यात आली. बैठकीची संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारी केली होती.
कोरोना साथीमुळे प्रश्नोत्तराच्या तासाचा कालावधी अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरेही लेखी स्वरूपात दिली जातील. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे असल्याने राज्यसभा चेंबर, गॅलरी, लोकसभा चेंबर येथे खासदारांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज व सदस्याचे भाषण नीट ऐकता यावे यासाठी दोन्ही सभागृहांच्या गॅलरीमध्ये स्क्रीन लावण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.