अहमदनगर | जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये ह्या वर्षी पाऊस अत्यंत कमी पडला आहे. जंगलामधील असलेले पाणी कमी झाले आहे. हे पाणी वेळीच अडवले नाही तर येथील असलेल्या वन्य प्रणी आणि पशू-पक्षी यांना पाणी पिण्यास मिळणार नाही. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘अंघोळीची गोळी’ या सामाजिक संस्थेने श्रमदानातून पाभूळवंडी येथील वन विभागात दोन लहान तलाव बांधण्याचे काम चालू करण्यात आले.
प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून “अंघोळीची गोळी” ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे.
झाडांना संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी खिळेमुक्त झाडं ही मोहिम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरू केली आहे. अगदी अल्पावधीतच ही मोहिम व्यापक पध्दतीने महाराष्ट्रभर पसरत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्तझाडं ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.
सुरवातीला पाभूळवंडी गावातील नागरिकांना ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेची माहिती देण्यात आली. यावेळी दिपावलीच्या सुट्टीसाठी आलेली मुले आणि ज्ञानदेव उगले, ममताबाई भांगरे, रोषण उगले, सागर लेंडे,संदिप लेंडे, अभिषेक लेंडे, नितीन लेंडे, लहू बांगर, विक्रम उगले सहभागी झाली.
प्राध्यापक नामदेव बांगर यांच्या पुढाकाराने अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू केलेली ‘अंघोळीची गोळी’ ही संस्था प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करीत दिवाळी साजरी करणार आहे.
‘आम्हालाही तुमची साथ हवी आहे,त्यासाठी आम्हाला संपर्क करा’ असे आवाहन प्रा.नामदेव बांगर यांनी केले आहे. यासाठी त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले आहे.
९४२२४९७१३२ अंघोळीची गोळी – अहमदनगर जिल्हा