पुस्तक परिचय | योगेश जगताप
साहित्यिक जीवनातील आपल्या जवळच्या व्यक्तींचा शोध ‘गोत्र’ या पुस्तकातून डॉ. रवींद्र शोभणे यांनी घेतला आहे. साहित्यक्षेत्रात कथा, कादंबऱ्या, ललितलेखन, संपादन, अनुवाद अशा विविध प्रकारांत चौफेर लिखाण शोभणे यांनी केलं आहे. या प्रवासादरम्यान त्यांना भेटलेल्या व्यक्तींचं चित्रण म्हणजेच गोत्र हे पुस्तक. विविध नियतकालिकांमध्ये लिहिल्या गेलेल्या लेखांचं संपादन करून हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. डॉ. सदानंद बोरसे यांनी हे संपादन केलं आहे. गोत्रमधील बहुतांश व्यक्ती या विदर्भातील आहेत. शोभणे यांचा एकूण साहित्यप्रवासच या भागातील असल्यामुळे या व्यक्तींच्या शोभणेंनी केलेल्या व्यक्तिचित्रणात आपण नकळत विदर्भाच्या साहित्य संस्कृतीशी जोडले जातो. शोभणेंनी निवडलेल्या दहा व्यक्तींमध्ये कवी माणिक गोडघाटे (ग्रेस), प्रा. द.भि. कुलकर्णी, प्रा. मनोहर तल्हार, प्रा. या.वा. वडस्कर, प्रा आनंद यादव, डॉ. आशा सावदेकर, रवींद्र गोडबोले, डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी, श्रीधर शनवारे आणि मनोहर म्हैसाळकर यांचा समावेश आहे.
वैदर्भिक साहित्याची सफर घडवून आणत असताना साहित्यिक मंडळींच्या बारीकसारीक अदबी शोभणे यांनी समर्पकपणे लिहल्या आहेत. पुस्तकात वर्णन केलेली मंडळी शोभणेंच्या आयुष्यात सहकारी, शिक्षक, मार्गदर्शक आणि मित्र म्हणून आलेली आहेत. त्यांच्यासोबत जगत असताना स्वतः शोभणेंचं साहित्यिक वर्तुळ कसं विस्तारलं हे आपल्याला जाणवतं. मैत्रीच्या विविध पैलूंची आठवणही साहित्याच्या परिभाषेत सांगितल्यामुळे ‘विदर्भ साहित्य’ या विषयाची तोंडओळखच आपल्याला या पुस्तकातून होते
समीक्षक असल्याने टीकात्मक परीक्षण करण्याकडे पुस्तकाचा कल नाही. साहित्याच्या आवडीने एकत्र आलेल्या समकालीन तसेच पुढच्या पिढीतील लोकांच्या साहित्यिक मैत्रीविषयी या पुस्तकात भरपूर वाचायला मिळतं. विदर्भ साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जनसाहित्य, अमृता प्रीतम यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं साहित्य संमेलन, धनवटे कॉलेज हे संदर्भ पुस्तकातील जवळपास प्रत्येक प्रकरणामध्ये वाचायला मिळतात.
विदर्भ साहित्य संघाच्या निमित्तानेच यातील बहुतांश साहित्यिक मंडळी जोडली गेल्याचं लक्षात येतं. या लोकांशी मैत्री करण्याचा हेतू सांगताना शोभणे म्हणतात, “मोठ्या माणसांच्या ओळखी करून त्यांच्याशी गप्पा मारायला मला फार आवडतं, त्याच आवडीतून साहित्याला चांगलं योगदान देणारं काही निर्माण करता आलं तर अधिक आनंद होतो”. पुस्तकातील बरीचशी पात्रं सुरुवातीला आपल्या परिचयाची नसली तरी शोभणे यांनी त्या पात्रांविषयीची उत्कंठा त्यांच्या लेखातून तयार केली आहे. पुस्तकातील काही उदाहरणांतून ते साहित्याशी कसं साधर्म्य दाखवतंय याची कल्पना येऊ शकते.
कवी ग्रेसच्या आठवणींविषयी शोभणे लिहितात, कॉलेजमध्ये शिकवत असताना ग्रेस एका वेगळ्याच धुंदीत असायचे. तासाला त्यांचं शिकवणं मंतरलेलं असायचं. कुणाशीही दाट परिचय झाला की ग्रेस त्या व्यक्तीला गुरुजी म्हणायचे. विदर्भाच्या साहित्यिक इतिहासाला ज्यावेळी ग्रेस यांच्यामुळं ओळखलं जाऊ लागलं तेव्हा आपण या दुनियेत सगळ्यात वेगळे आहोत असं ग्रेसना वाटायचं. आपल्या कलाकृतींचा लोकांनी आनंद घ्यावा, पण आपला फायदा घेऊन कुणी मोठं व्हावं हे ग्रेसना बिलकुल पटत नव्हतं.
द.भि.कुलकर्णींची ओळख व्हावी म्हणून स्वतः शोभणेंनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. आपल्या पाहण्यातील मराठी विषयाचे सर्वांत नीटनेटके प्राध्यापक द.भि.कुलकर्णी असल्याचं शोभणे सांगतात. साहित्यामध्ये प्रतिस्पर्धी असले तरी कवी ग्रेसही द.भि.कुलकर्णींच्या शिकवणीचे चाहते आहेत हे त्यांच्या “तुम्हाला तुकाराम आणि मर्ढेकर समजून घ्यायचे असतील तर द.भिं कडूनच” विधानातून आपल्याला लक्षात येतं. वाचनाचा आणि चिंतनाचा सर्वाधिक पैस असलेला समीक्षक म्हणून द.भि.कुलकर्णींचं विदर्भाच्या साहित्यातील योगदान शोभणे यांनी योग्यरितीने मांडलं आहे.
साहित्याच्या प्रांगणातही एखादा व्यक्ती दुर्दैवी ठरू शकतो हे मनोहर तल्हार यांच्या उदाहरणातून शोभणे पुढे आणतात. लेखनावर परिश्रम घेण्याची जिद्द आणि काटेकोरपणा तल्हार यांच्याकडे होता. ग्रामीण आणि नागरी विषयावर उत्तम लेखनही त्यांनी केलं. चित्रपट समीक्षणातही त्यांचा हातखंडा होता. त्यांची माणूस नावाची कादंबरी साहित्यविश्वातील अप्रतिम कलाकृती आहे. असं असतानाही त्यांना जे मिळालं ते पुरेसं न्याय देणारं नव्हतं हे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरून शोभणे वाचकांपर्यंत पोहचवतात.
समवयस्क साहित्यिक मित्रांच्या आठवणी शोभणे सांगत असताना एका पिढीचं अंतर असणारे आनंद यादवसुद्धा शोभणेंच्या जीवनात वेगळं स्थान मिळवून जातात. ‘ललितलेखन करणाऱ्यांनं लिहीत रहावं, चळवळीत किंवा इतर गोष्टींत पडू नये ते त्याच्या प्रतिभेच्या आणि सर्जनाच्या आड येतं’ असा विचार असलेल्या साहित्यिक मंडळींसोबत वावरताना आनंद यादव यांनी ठाम भूमिका घेत साहित्य चळवळ उभारणं थांबवलं नाही. विदर्भ साहित्य परिषदेची स्थापना त्याचाच एक भाग असल्याचं शोभणे सांगतात. झोंबी या त्यांच्या आत्मचरित्रपर कथनाने अवघ्या महाराष्ट्राला व्यथित केलं होतं. याचं वर्णन एका प्रसंगात करायचं झाल्यास, झोंबी वाचून ५ ते ६ तरुणांचा एक गट रात्रभर प्रवास करुन आनंद यादवांना भेटायला आला होता. घरी कुणी नसल्यामुळे आनंद यादव त्यांना खायला काही देऊ शकत नव्हते. याची खंत यादवांनी व्यक्त केल्यानंतर ते तरुण म्हणाले, “आम्हाला काय बी नको साहेब, झोंबी वाचल्याबरं तळमळीनं वाटू लागलं तुम्हाला भेटलं पायजे, मग आलो निघून. तुमच्या पायावर डोकं टेकू द्या, बस्स एवढंच”. एखादा साहित्यिक मनुष्य ज्यावेळी लोकांच्या जगण्याचा ठाव घेतो त्यावेळी काय होतं हे आनंद यादवांच्या रुपात प्रत्यक्ष पाहण्याची संधी शोभणेंना मिळाली होती.
श्रीपाद जोशी आणि मनोहर म्हैसाळकर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या मजबुतीकरणासाठी केलेल्या खटपटी आणि तडजोडी, घातलेले वाद यावर एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकतं. विदर्भ साहित्य संघाला १०० वर्ष पूर्ण होत असताना त्यात सर्वाधिक योगदान दिलेल्या मनोहर म्हैसाळकरांचा यथोचित गौरव करणं किती गरजेचं आहे, हेसुद्धा शोभणे उदाहरणदाखल सांगतात.
या पुस्तकातील बाकी साहित्यिक मित्रांच्या आठवणीही भरपूर आहेत. साहित्याची उत्तम जाण असलेल्या रवींद्र शोभणे यांनी साहित्यिक मुशाफिरीच या पुस्तकातून घडवून आणली आहे. यातील अनेकांशी या ना त्या कारणाने वादविवाद होऊनही जमेल तितका संवाद शोभणेंनी सर्वांशी कायम ठेवला. ज्यांच्याशी बोलणं जमलं नाही त्यांच्याविषयीची खंतही व्यक्त केली. एकूणच साहित्य हा आपला गोत्र मानणारी सर्व मंडळी या पुस्तकाची नायक/नायिका आहेत.
साहित्याच्या अनोळखी प्रदेशात फिरत असताना आपण त्या साहित्यात रममाण होऊन जातो ही गोत्रची जादू आहे. ही जादू नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हीही नक्की वाचा – ‘गोत्र’
——————————————————
पुस्तकाचं नाव – गोत्र
लेखक – डॉ रवींद्र शोभणे
संपादन – डॉ सदानंद बोरसे
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
पाने – १८०, किंमत – २५० रुपये