शिरढोणमध्ये स्वाभिमानीने ऊसतोडी बंद पाडत रोखली वाहने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

ऊसदराचा तोडगा निघाल्याशिवाय गाळप हंगाम करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देत आज कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमधील ऊसतोडी बंद पाडल्या. याशिवाय वांगी येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची हवा सोडून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरु केले असले तरी अद्याप दराचा तोडगा निघालेला नाही.

रविवारी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली होती. परंतू त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारने ऊस दराबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. जयसिंगपूरमध्ये २३ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. त्यानंतर ऊसदराचा तोडगा निघण्याची शक्यता असल्याने दराचा तोडगा निघाल्याशिवाय कारखानदारांनी ऊस तोड करू नये, अशी स्वाभिमानी संघटनेने केली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावात ऊसतोडी सुरु आहेत. शिरढोण येथे कागवाड कारखान्याची ऊसतोडी सुरु असल्याचे निदर्शनास येताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडी बंद पाडल्या. वांगी व पलूस-अंधळी रस्त्यांवरुन उदगीर शुगर पारे या कारखान्याकडे ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडत स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक रोखली. यावेळी संदिप राजोबा, पोपट मोरे, धनंजय पाटील आदींसह स्वाभिमनीचे कार्यकर्ते उपस्थित होते.