नवी दिल्ली : छत्रपत्री शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत. भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी टीव्ही ९ शी बोलताना याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदींची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याने महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. शिवप्रेमींच्या या उद्रेकापुढे अखेर भाजपला माघार घ्यावी लागली.
मात्र या पुस्तकाचे लेखक जय गोयल यांनी हे पुस्तक मागे घेण्यास नकार दिला आहे.“शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदींच्या तुलनेवर पुस्तक परत घेण्याचा प्रश्नच नाही. मी याबद्दल माफी मागणार नाही. तसेच हे पुस्तकही परत घेणार नाही,” अशी प्रतिक्रिया देत जय भगवान गोयल यांनी दिली. जय भगवान गोयल हे भाजप नेते असून दिल्लीच्या भाजप कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने महाराष्ट्रभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशलमिडीयावर देखील नेटकऱ्यांनी या प्रकरणाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि या पुस्तकाचा निषेध व्यक्त केला. या पुस्तकावर लवकरात लवकर बंदी घालावी अशी मागणी कारण्यात येत आहे. पुस्तक मागे घेण्याचे आदेश भाजपने दिल्यामुळे तूर्तास तरी या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.