यवतमाळ प्रतिनिधी | महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही या भाडेतत्त्वावरील गाड्या ताफ्यात दाखल केल्या, मात्र त्या दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांच्या अपघाताचा आलेख मात्र वाढतच जात असल्याची परिस्थिती आहे. या गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामदायी प्रवासासाठीचा हेतू ठेऊन जरी ताफ्यात दाखल केल्या असल्या तरी प्रवाशांना मात्र आरामा ऐवजी मनस्ताप आणि नुकसानच सहन करावं लागत आहे. अशीच एक घटनायवतमाळ येथून दहा किलोमीटर असलेल्या चापर्डा गावाजवळ घडली आहे. यवतमाळ येथून नागपूरला जाणारी शिवशाही बस आणि कळंबकडून यवतमाळकडे येणार्या मालवाहू मेटॅडोरची समोरासमोर धडक होऊन त्यात मेटॅडोर चालक जागीच ठार झाला. यात बसचालकसह प्रवासीही किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात ४५ वर्षीय शंकर धोंडराम अलट यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, शिवशाही बस महामार्गावरील बाजूच्या डिवाइडरवर जाऊन चढली, तर मेटॅडोरची संपूर्ण केबिन जाम होऊन चालक स्टेरिंगमध्ये फसला होता. हा अपघात महामार्गावरील एकच मार्ग सुरू असल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार विजय चव्हाण आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात शिवशाही बसचा चालक गंभीर जखमी असून, त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..