सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
येलूर येथील शहाजी उमाजी गावडे यांच्या येलूर-वशी रोडवरील शेतातील शेडला शॉर्टसर्किटने आग लागल्याने तीन जनावरे आगीने होरपळून जखमी झाले. तर कुत्रे व कोंबडया आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
दुपारी एकच्या सुमारास येलूर-वशी रोडवरील शहाजी गावडे यांच्या शेडपासून शंभर ते दीडशे फुटावर असणाऱ्या विद्युत पोलवर ठिणग्या पडून उसाच्या पाचटावर पडल्याने उसामध्येच आग लागली. कडक ऊन व वारा असल्याने आग भडकत गावडे यांच्या शेडला लागली. शेडमध्ये पंढरपूर जातीची व मुऱ्हा जातीची दोन म्हैसी व एच एफ जातीची गाई अशी तीन जनावरे आगीने होरपळून गंभिररीत्या जखमी झाली आहेत.
तसेच शेडमध्ये बांधलेले कुत्रे व चार कोंबड्या जगीच जळून मृत्यू झाल्या. दुपारची वेळ असल्याने शेडवर कोणीच नव्हते. बाहेरील मेंढपाळांनी घटनेची माहिती गावडे यांना दिल्याने गावडे यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत कार्यालयात घटनेची माहिती दिली. त्यामुळे विद्युत पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. नागरिकांच्या साहाय्याने पाणी मारून आग वीझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत शेडमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. शेतातील उभा ऊस हि जळाल्याने एक लाख साठ हजाराचे नुकसान झाले आहे.