सातारा प्रतिनिधी। योगेश जगताप
सामाजिक विषयांवर लघुपट, चित्रपट येण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढत चाललं आहे. माध्यम क्षेत्रात अनेक अद्ययावत साधनं उपलब्ध झाल्यामुळे, तसेच अशा गोष्टी शिकण्याची आवड तरुणाईमध्ये वाढू लागल्याने हे प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा शहरामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. ११ ते १४ डिसेंबर २०१९ या कालावधीत साताऱ्यातील शाहू कला मंदिरामध्ये बिहाईंड दि आईज नावाने हा लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेची मुख्य संकल्पना भेदभावाचं सामाजिक वास्तव आणि त्यावरील जनजागृती हे असून यामध्ये विशेषतः जातीभेद, वंशभेद, पंथभेद, रंगभेद, शैक्षणिक समस्या, स्त्रीवाद, अंधश्रद्धा या विषयांवर भर देण्यात आला आहे.
लघुपट, माहितीपट, डॉक्युमेंट्री, ऍनिमेशन फिल्म अशा स्वरूपात आपली कलाकृती स्पर्धकांना पाठवता येणार आहेत. सद्यस्थितीत परदेशातून स्पर्धेसाठी सहभाग नोंदवणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचं महोत्सवाचे आयोजक तुषार बोकेफोडे यांनी सांगितलं. ४ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये ५० हून अधिक लघुपटांची मेजवानी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्यांसाठी विविध प्रकारची ३० पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके अभिनय, संगीत, प्रकाशव्यवस्था, लेखन, वेशभूषा आणि तांत्रिक विभागात देण्यात येणार असल्याचं तुषार बोकेफोडे यांनी सांगितलं.
साताऱ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा लघुपट महोत्सव होत असल्याचा आनंद होत असून यामुळे स्थानिक कलाकारांनाही चांगलं व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचं मत कला दिग्दर्शक संतोष संखद यांनी व्यक्त केलं. आपलं काम करत असतानाच सामाजिक बांधिलकी जोपासत साताऱ्याच्या कला क्षेत्रात हा आगळावेगळा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केला.
या लघुपट महोत्सवासाठी हॉटेल राधिका पॅलेस, कुल गोळा कॅफे, एम्बिशन क्लासेस आणि अखिल भारतीय बुद्ध महासंघ यांचं प्रायोजक म्हणून सहकार्य लाभलं आहे.
३ दिवसांच्या या महोत्सवानंतर फिल्म मेकिंगची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ज्वलंत विषयावर आधारित या महोत्सवामुळे तरुणाई विचार करण्यास प्रवृत्त होईल, त्यांच्या डोक्यातील कल्पनांना वाव मिळेल आणि उत्तम दर्जाच्या कलाकृती साताऱ्याचा नावलौकिक जगभरात पोहचवतील असं तुषार बोकेफोडे यांनी सांगितलं.
बिहाईंड दि आईज लघुपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क –
तुषार बोकेफोडे – 8806434666
शिवाजी वाघमारे – 9881535173
प्रेम लाखे – 8552962896