टीम, HELLO महाराष्ट्र | जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व 48 संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने शनिवारी दोषी ठरवले. तसेच सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे पोलिसांना आदेश न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी दिले आहे. दुपारी अडीच वाजता शिक्षेचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. घरकुल घोटाळ्यामुळे जळगाव महापालिकेवर कोट्यवधींचे कर्ज झाले आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून त्या जळगाव शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कोर्टात केला.
दरम्यान ‘घरकुल योजना’ ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती.
मात्र, या योजनेतील सावळागोंधळ सन 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.