‘सोलापूर मध्य’साठी शिवसेनेकडून ‘काँग्रेसच्या निष्ठावंताला’ उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी। अखेर ‘सोलापूर शहर मध्य’चा शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रश्न निकाली लागला आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.  निवडणुकीच्या तोंडावर ‘सोलापूर शहर उत्तर’चे माजी काँग्रेस आमदार दिलीप माने यांना शिवसेनेकडून ‘सोलापूर शहर मध्य’साठी उमेदवारी जाहीर झाली आहे. दिलीप माने यांना शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ‘एबी फॉर्म’ही दिला आहे. आता काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे दिलीप माने अशी थेट लढत होणार आहे हे स्पष्ट झाले आहे. मागच्या वेळेचे शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे आता काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार आणि सोलापूर जिल्ह्यातील नेते दिलीप माने यांनी काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा देत शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता. यावेळी दिलीप माने यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंकडून शिवबंधन बांधून घेतले होते. माने मागील २५ वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.

त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी दिलीप माने यांचा पराभव केला होता. दरम्यान त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर महेश कोठे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे विधानसभेसाठी कोणाला तिकीट मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. दरम्यान दिलीप माने यांना तिकीट मिळाल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे सोलापूरकरांना मिळाली आहेत. तेव्हा काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते तसेच शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले दिलीप माने यांच्यात काटे की टक्कर होणार यात शंका नाही.

Leave a Comment