प्रतिनिधी नितीन चव्हाण : पकडलेला हायवा सोडण्यासाठी १ लाखांची लाच स्विकारताना गेवराई येथील नायब तहसीलदार तसेच अन्य एका खाजगी इसमाला रंगेहाथ पकडले. हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचून केली. या कारवाईने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. लाच घेणाऱ्या नायब तहसीलदारचे नाव प्रल्हाद सदाशिवराव लोखंडे (वय ४३ वर्ष) व अन्य एक खाजगी इसम आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा करणारा एक हायवा महसूल विभागाच्या पथकाने पकडला होता. या यानंतर हा हायवा सोडण्यासाठी येथील तहसीलमधील महसुलचे नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे यांनी खाजगी इसम यांच्यामार्फत हायवा मालकाकडे १ लाखाची मागणी केली होती. मात्र तक्रारदार हा लाच देण्याच्या तयारीत नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी केल्यानंतर नायब तहसीलदार लोखंडे यांनी लाच मागितल्याचे दिसून आले. त्यानुसार दि. २९ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयात सापळा रचून नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे व खाजगी इसम या दोघांनाही १ लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलिस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोना अमोल बागलाने, घोलप, बरकडे, वीर या टीमने केली असून याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.