औरंगाबाद : नोटा अदलाबदली करून चलनात आणण्यासाठी 10 लाख गुंतवा तुम्हाला 20 लाख रुपये देतो असे आमिष दाखवून फुलंब्री परिसरातील एका व्यापाऱ्याचे दहा लाख लुबाडणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यात ताब्यातून रोख रकमेसह 3 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात शेख हारूण शेख छोटू व अस्लम इब्राहिम कुरेशी रा. जालना अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
राजू बाबुलाल शिंदे (वय 42, रा.पाल, फुलंब्री) यांचे औरंगाबाद जळगाव रोडवरील पाल फाटा येथे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर काळे पाटील रा. कोपरगाव आणि सुनील रा. कोपरगाव असे दोघे आले होते. या दोघांनी नोटांची अदलाबदल करण्यासाठी गुंतवलेल्या पैशाचे डबल पैसे देण्याचे आमिष दाखवले. राजू शिंदे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्या दोघांनी अहमदनगर येथील एका बंगल्यात बोलावून काही पैसेही दिले.
ते बाजारात चालवण्यास काही अडचण आली नाही. यामुळे शिंदे यांचा या दोघांवर विश्वास बसला. शिंदे यांनी 10 लाखांची जुळवा जुळव करून 4 जुन रोजी दहा लाख रुपये भोकरदन नाक्यावर येऊन त्या दोघांकडे दिले. त्या बदल्यात मिळालेल्या काळ्या पिशवीत मात्र खेळण्यातील पैसे असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सिल्लोड पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणात शेख हारूण शेख छोटू आणि अस्लम इब्राहिम कुरेशी रा. जालना हे असल्याचे निष्पन्न झाले.शुक्रवारी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी आणखी दोन साथीदाराच्या मदतीने लुटल्याची कबुली दिली. या दोघांकडून रोख रक्कम व पाच मोबाईल असा 3 लाख 24 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे पोलीस अंमलदार गणेश राऊत, नामदेव शिरसाठ, संजय काळे, प्रमोद खांडेभराड, विक्रम देशमुख,बालू पाथरीकर, किरण गोरे, वाल्मिक निकम, राहुल पगारे, शेख नदीम, संजय भोसले ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले, योगेश तरमाळे, चालक संजय तांदळे, संतोष डमाळे यांनी केली.