शुगर, ताप, संसर्गसह 100 औषधे स्वस्त दरात मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशभरामध्ये वैद्यकीय उपचार आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे महाग होत चालली आहेत. अशातच केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून  (NPPA) 69 नवीन फॉर्म्युलेशनची किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता कोलेस्टेरॉल, शुगर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, अँटिबायोटिक्स अशी 100 औषधे स्वस्त झाली आहेत. या निर्णयामुळे आता सर्वसामान्यांचा औषधांवरील खर्च कमी होणार आहे.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, आता इथून पुढे नवीन पॅकिंगवर सुधारित दर लावले जातील. तसेच डीलर नेटवर्कला देखील नवीन किमतींची माहिती द्यावी लागेल. मध्यंतरी म्हणजेच कोरोना महामारीनंतर औषधांच्या किमती आणि वैद्यकीय सेवा दुपटीने महागल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे परवडत नव्हते. या सर्व बाजू तपासूनच केंद्राने औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी नवीन पॅकिंगवर सुधारित दर लिहून करण्यात येणार आहे. यामध्ये औषधे बनवणाऱ्या कंपन्यांनी काही औषधांमध्ये वैयक्तिक पैसे भरले असतील तर ते निश्चित किमतीवर जीएसटी वसूल करू शकतात. तसे नसल्यास त्यांना सुधारित दरानुसारच औषधे पुरवावी लागतील. यामुळे सर्वसामान्यांना नव्या किमतीसह औषधे विकत घेता येते.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक पैसा हा आरोग्य सेवेवर खर्च होतो. यामध्ये गोरगरिबांना उपचार सेवा आणि औषधाचे दर परवडत नसल्यामुळे अनेकवेळा ते उपचार मध्येच सोडण्याचा देखील निर्णय घेतात. यामुळे रुग्णांची प्रकृती आणखीन खालावत जाते. आजवर अनेक रुग्णांनी वेळेत योग्य औषधे न मिळाल्यामुळे जीव गमावला आहे. त्यामुळे या बाबी विचारात घेऊन केंद्र सरकारने पुन्हा एकदा औषधांवरील दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.