कॅप्टन अमोल यादव यांना राज्य सरकारच मोठं गिफ्ट : विमान निर्मितीच्या संशोधनासाठी 12.91 कोटींचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील भारतीय बनावटीचे पहिले विमान आणि त्याची निर्मिती करणारे अमोल यादव यांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी अमोल यादव यांना 12.91 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाकडून विशेषबाब म्हणून हा निधी देत राज्य सरकारकडून यादव यांना गिफ्ट देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी सामाजिक न्याय विभागाकडून विशेष बाब म्हणून पाटण तालुक्यातील सळवे गावचे कॅप्टन अमोल यादव यांना विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी निधी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

पाटण तालुक्यातील सळवे हे कॅप्टन यादव यांचे मूळ गाव आहे. भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवून ते ‘मेक इन इंडिया’मध्ये प्रदर्शित केल्यानंतर देशभर चर्चेत आले. 1997 पासून यादव हे विमान तयार करण्याचा प्रयत्न करत होते. तिसऱ्या प्रयत्नानंतर 2009 मध्ये त्यांना यश मिळाले. 2019 मध्ये त्यांना परमीट टू फ्लाय मिळाले.

मागील महिन्यातील बैठकीत निर्णय आता प्रत्यक्ष मंजुरी

विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी कॅप्टन अमोल यादव यांना 12.91 कोटी रुपये देण्याचा निर्णय मागील महिन्यात पार पडलेल्या राज्य सरकारच्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान एक महिन्यानंतर आता कॅबिनेटच्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाने विशेषबाब म्हणून कॅप्टन यादव यांना निधी देण्यात निर्णय घेतला.

पंतप्रधान मोदींकडूनही झालेय कौतुक

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील साळवे गावात जन्मलेल्या कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान ‘मेक इन इंडिया’मध्ये प्रदर्शित केले होते. त्याच्या विमाननिर्मितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेतली आणि यादव यांचे त्यावेळी त्यांनी विशेष कौतुक केले होते.