संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळे वळण; न्यायालयात 1400 पानी आरोपपत्र दाखल

0
2
santosh deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राज्यभरात या हत्या प्रकरणाबाबत आवाज उठू लागल्यानंतर पोलिसांनी केजच्या न्यायालयात तब्बल 1400 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबींचा समावेश आहे. तसेच, हत्येच्या कटात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव देखील आरोपपत्रात दाखल करण्यात आले आहे.

वाल्मिक कराड मुख्य आरोपी

पोलीस तपासात वाल्मिक कराड याला या प्रकरणातील मुख्य आरोपी घोषित करण्यात आले आहे. पोलिसांनी विविध पुरावे, व्हिडिओ क्लिप आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. विशेष म्हणजे, संतोष देशमुख यांची हत्या केवळ सूडातून नव्हे, तर खंडणीच्या वादातून घडल्याचे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणात केवळ हत्या नव्हे, तर खंडणी आणि अॅट्रॉसिटीचे आरोपही लावण्यात आले आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संतोष देशमुख खंडणीच्या व्यवहारात अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे हा गुन्हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे.या हत्येच्या कटात एकूण पाच गोपनीय साक्षीदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या पत्रात, या साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांच्या आधारे आरोपींविरुद्ध पुरावे सादर करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, नांदूर फाट्यावर झालेल्या एका गुप्त बैठकीत हत्येच्या कटाची योजना आखण्यात आल्याचे ही आरोपपत्रात नमूद केले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडीओ पुरावा लागला आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये आरोपी सुदर्शन घुले हे संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे, तर हा व्हिडीओ कॉल आरोपी जयराम चाटे याने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याची माहिती समोर आली आहे. यावरूनच पोलिसांनी गुन्ह्यामागे संपूर्ण टोळी कार्यरत असल्याचे निष्कर्ष काढला आहे.

दरम्यान, न्यायालयात दाखल झालेल्या 1400 पानी आरोपपत्रावर पुढील सुनावणी सुरू होणार आहे. आरोपींवर ठोस पुरावे असल्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.