पोलिस सुस्त… चोरटे मस्त : एका रात्रीत 15 घरे फोडली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

चाफळ विभागातील 5 गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत बंद 15 घरे फोडली  आहेत. या घरफोडीत सुमारे 19 तोळे सोन्यासह लाखांचा ऐवज केला लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या घरफोडीमुळे चाफळ विभागात घबराटीचे वातावरण आहे. तर पोलिसांच्या रात्र गस्ती नसल्याने व कामचुकारपणामुळे अशा पध्दतीने चोरट्यांनी लक्ष केल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाफळ विभागातील जाळगेवाडी खालची व वरची, माथनेवाडी, गमेवाडी व माजगाव अशा एकूण पाच गावात तब्बल 15 ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. माथनेवाडी येथील आनंदराव माथने, आत्माराम माथने यांच्या घराची कुलूपे कटरच्या साह्याने तोडून चोरट्यांनी चोरी केली. जाळगेवाडी येथील महादेव भिकू चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीचे कपाटातील 7 तोळ्यांचा ऐवज लंपास केला. याच गावातील श्रीरंग पांडुरंग साळुंखे, महादेव लक्ष्मण साळुंखे, रामचंद्र लक्ष्मण साळुंखे, बाळाराम गणपत साळुंखे, अमोल चंदर साळुंखे, तात्याबा गणू मानकर, कृष्णत शंकर काटे, साहेबराव अंतू शिंदे अशी एकूण 9 घरे फोडली गमेवाडी येथे मुबारक अब्दुल मुल्ला यांचे घराचे कुलुप तोडून साडेसात तोळे सोन्याचे दागिन्यावर डल्ला मारला. तर डॉ अमोल बाळकृष्ण देसाई यांच्या घरातही चोरी केली आहे.

माजगाव येथे शिवाजी किसन मिरोखे, मोहन कृष्णराव देशमुख यांच्या घरांची कुलुपे तोडत चोरट्यांनी चोरी केली. घटनेची माहिती मिळताच मल्हार पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील चाफळ दूर क्षेत्रचे मनोहर सुर्वे सिद्धनाथ शेडगे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या चोरीमध्ये अंदाजे 19 ते 20 तोळे सोन्याचे दागिने व लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकाच रात्री तब्बल 15 घरे चोरट्याने फोडल्याने चाफळ परिसरात घबराटीचे वातावरण आहे