निमसोडला घरफोडीत 15 लाखांचा ऐवज लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मायणी | निमसोड (ता. खटाव) येथील संजय हिंदुराव घाडगे यांच्या बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञातांनी सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संजय घाडगे हे व्यवसायानिमित्त उत्तर प्रदेशात राहतात. निमसोड येथे त्यांची आई वास्तव्यास असून त्या बुधवार दि. 21 डिसेंबर रोजी नातेवाईकांच्या अंत्यविधीला बाहेर गावी गेल्या होत्या. याचाच अज्ञातांनी गैरफायदा घेत बंद घर फोडून सोने व चांदीचे सुमारे 14 लाख 91 हजाराचे दागिने व 10 हजारांची रोकड लंपास केली.

सदरची घटना घाडगे यांच्या चुलत्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याची माहिती संजय घाडगे यांना दिली. त्यांनी तात्काळ याची माहिती आईला देवून आपण स्वतः निमसोडकडे येण्यास निघाले. निमसोड येथे आल्यानंतर त्यांनी वडूज पोलिस ठाण्यात धाव घेवून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र श्वान पथक परिसरातच दरम्यान, घुटमळत राहिले. पोलीस उपविभागीय अधिकारी केंद्रे, पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर करत आहेत.