व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड नगरपालिकेकडून पाणी बिलात 15 टक्के सूट : लोकशाही आघाडीच्या मागणीला यश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरात पालिकेने गेल्या वर्षभरात शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने अनेक राजकीय पक्ष व संघटना यांनी निवेदन देवून तसेच आंदोलन केली. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. यावर आज पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासोबत चर्चा झाली. यामध्ये 15 टक्के तिमाही पाणी बिलात सूट देणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

कराड नगरपालिकेकडून 2007 सालापासून रखडलेली 15 वर्षाची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना अमंलात आणण्यासाठी दिवसातून दोन वेळा मीटरप्रमाणे बिल आकारणी करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक नागरिकांना पाणीबिल दुप्पट, चाैप्पट आले होते. त्यानंतर शहरातील सामाजिक संघटना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी तसेच बाळासाहेबांची शिवसेना यांनी निवदेन दिली. तसेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. यावर आज पालिकेने चर्चेचे निमंत्रण दिले होते. या प्रश्नावर लोकशाही आघाडीने 20 टक्के पाणी बिलात सूट देण्याची मागणी केली. यावर जवळपास 2 ते 3 तास मोठी चर्चा पार पडली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी 15 टक्के सूट देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

या बैठकीला लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, पोपटराव साळुंखे, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, सुहास पवार, प्रवीण पवार, अख्तर आंबेकरी, राकेश शहा, राहुल भोसले, मोहसीन आंबेकरी, नवाज सुतार यांच्याह नागरिक तसेच लोकशाहीच आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी 15 टक्के सूट जाहीर करताच लोकशाही आघाडीने नागरिकांच्यावतीने आभार मानले.