Satara News : कराडमध्ये 24 नोव्हेंबरपासून यशवंत कृषी औद्योगिक प्रदर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जाणार असलेचे माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी दिली. तसेच कराड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्याला ‘यशवंत शेतीनिष्ठ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कराड येथे गेली १८ वर्षे लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे संकल्पनेतून कृषी प्रदर्शन भरविले जाते यावर्षी ही मागील परंपरा जोपासत शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने प्रदर्शन भरविणेची प्रक्रीया सुरु केली आहे हे प्रदर्शन स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटच्या आवारात भरत आहे.

प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे स्टॉल सहभागी होणार असून यातील १०० स्टॉल शेतक-यांच्या कृषी माल विक्रीसाठी मोफत पुरविले जाणार आहेत. प्रदर्शनात ऊस, केळी, भाजीपाला पिक स्पर्धा व प्रदर्शन विविध फळे, फुले स्पर्धा व प्रदर्शन तसेच पशु-पक्षी स्पर्धा प्रदर्शन भरविले जाणार आहे.

प्रदर्शनाचे उदघाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथराव शिंदे, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारचे पालकमंत्री मा. ना. शंभुराज देसाई, राज्याचे कृषी मंत्री मा. ना. धनंजय मुंडे, पणन मंत्री मा. ना. अब्दुल सत्तार, महसूल व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री मा. ना. दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) खासदार मा. श्रीनिवास पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर व सातारा जिल्हातील विविध खात्यांचे अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

मंगळवारी कृषी प्रदर्शाच्या मंडपाचे भुमिपूजन

स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, मा. धैर्यशील कदम मा. मनोज घोरपडे, यांचे शुभहस्ते मंगळवार दि. १४ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रदर्शनस्थळी होणार आहे.

मुख्यमंत्री कराड दौऱ्यावर येणार का?

दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड दौऱ्यावर येतात. प्रीतिसंगमावरील समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतात. मात्र, यंदा मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना २४ नोव्हेंबरची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नक्की येणार का, हे डेडलाईन दिवशीच स्पष्ट होईल.

तीन आठवडे जनावरे बाजार बंद

यशवंतराव चव्हाण कृषी-औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनामुळे शेती उत्पन्न बाजार समितीचा दि. १६, २३ आणि ३० नोव्हेंबर हे तीन जनावरे बाजार बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि जनावरे घेऊन येऊ नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी केले आहे.