हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोरोना महामारीपासून आपला देश आता कुठे जाऊन सावरला आहे. अशातच आता चीनमध्ये थैमान घालणाऱ्या ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसचा (HMPV) प्रादुर्भाव आता महाराष्ट्रातही दिसून येत असल्याचे समोर आले आहे. नागपुर येथील 2 मुलांना या विषाणूची लागण झाली आहे. या मुलांच्या HMPV टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये ७ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलगी या दोघांमध्ये खोकला आणि तापाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांची HMPV टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु या दोघांमधील लक्षणे सौम्य असल्यामुळे त्यांना औषधोपचारानंतर पुन्हा घरी सोडण्यात आले आहे. आता या दोन्ही मुलांची प्रकृती चांगली आहे.
मुंबईत अद्याप एकही रुग्ण नाही
दरम्यान, मुंबईसारख्या शहरात HMPV बाधित रुग्ण आढळलेले नाहीत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. तरीही नागरिकांनी खबरदारीचे नियम पाळावे आणि भीती न बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
HMPV लक्षणे
खोकला, ताप सर्दी अशी HMPV ची लक्षणे दिसतात. हा विषाणू जास्त प्रमाणात हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला पसरतो. त्यामुळे नागरिकांनी स्वतःचे काळजी घ्यावी. तसेच, सर्दी, खोकला, ताप झालेल्या लोकांपासून अंतर राखावे. शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.