रेठरे ग्रामपंचायतीचा पावणेदोन कोटीचा कर थकीत : प्रशासनाचा 60 जणांना दणका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने जनजागृती करत वारंवार सूचना देवूनही गावात ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी थकीत राहत असल्याने खातेदारांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली. ग्रामपंचायतीने थकीत खातेदारांची नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. कराड पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने काल व आजच्या दोन दिवसात 60 कनेक्शन तोडून थकितदारांना धक्का दिला आहे.

रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत तालुक्यात मोठी आहे. गावचा लोकवस्तीचा वाढता विस्तार लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनासमोर मोठा व्याप आहे. गाव कारभार करताना प्रशासनास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गावची लोकसंख्या 15 हजाराच्या घरात पोहचली आहे. त्याच धर्तीवर सोयी व सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीस मोठा आर्थिक भार सोसावा लागत आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकीत राहत आहे. आजमितीला पावणे दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे कारभार करताना अनेक अडचणी जाणवत आहेत. यावर उपाय करण्यासाठी नळ कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काल व आज कराड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय शेलार, ग्रामविकास अधिकारी संतोष इंगवले, आर. एन. कोळी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सकाळपासून नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली. यातून 60 कनेक्शन तोडली आहेत. याचा संबंधित ग्रामस्थांना धक्का बसला. तर सर्व ग्रामस्थांमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. यातून सव्वा दोन लाख रुपयांचा थकीत कर वसूल झाला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. सामाजिक कार्यकर्ते धनंजय मोहिते, नागेश कुलकर्णी व ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.