हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रेत सोमवारी मुंगी घाटातून कावड चढविताना तब्बल 13 भाविक दरीत कोसळले होते. या सर्व भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर यात्रेमध्ये दोघांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यातील एक भाविक बारामती येथील असून, दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख पटलेली नाही. विठ्ठल महादेव सागर (वय 45 वर्ष, रा. शिरवली बारामती) व एका 65 वर्षीय अनोळखी ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रेत 1 हजारहून अधिक कावडी शिखर शिंगणापूरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये तेल्या भुत्याची कावड ही मुंगी घाटातून वर चढवण्यात आली. या दरम्यान 13 भाविक दरीत कोसळून जखमी झाले होते. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील चार जखमींवर फलटण येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सासवड येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान, यावेळी बारामतीतून आलेले विठ्ठल महादेव सागर आणि अनोळखी ज्येष्ठ नागरिकाला बनाजवळ पोहोचल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना शिंगणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मंदिरापासून रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी तब्बल तीन तास लागले. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने या भाविकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या भाविकाचा ग्रामीण रुग्णालयातून इतर रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.
कावड यात्रेवेळी जखमी झालेल्यांना सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी मदत करून वर काढले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर रविवारी रात्री सागर यांना रुग्णवाहिकेतून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात, तर ज्येष्ठ नागरिकास दहिवडी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले जात होते. या दरम्यानच दोघांचाही मृत्यू झाला आहे.