जातपंचायतीच्या 5 जणांवर गुन्हा : प्रेमसंबधाच्या संशयावरून 2 लाखांचा दंड अन्यथा बहिष्कृतची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके

पुसेगाव (ता. खटाव) येथे महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाच्या संशयावरून बेकायदा जातपंचायत भरवून मुलाच्या कुटुंबियांवर 2 लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावणे. तसेच दंड न भरल्यास सामाजिक बहिष्कार टाकल्या प्रकरणी 5 जणांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मतन लक्ष्मण शिंदे, लाव्हाऱ्या लक्ष्मण शिंदे, विकास मिन्या शिंदे, साजन किर्लोस्कर शिंदे, इंद्रा चंद्रकांत शिंदे अशी त्यांची नावे आहेत. याबाबत माधुरी धनू भोसले यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर अंनिसच्या मदतीने हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती अंनिसमार्फत जात पंचायत विभागाचे शंकर कणसे, मोहसीन शेख व हमीद दाभोलकर यांनी दिली.

याबाबतची माहिती अशी, माधुरी भोसले यांच्या मुलाचे एका महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पंचांनी जातपंचायत भरवून त्यांना सुमारे 2 लाख रुपये दंड पाच महिन्यापूर्वी ठोठावला होता. हा दंड न भरल्यास, त्यांना समाजातून बहिष्कृत करण्याची धमकीही देण्यात आली होती. समाजाच्या दबावाने हातावर पोट असलेल्या माधुरी यांनी कर्ज काढून कसेबसे 80 हजार रुपये पंचांना दिले. उरलेले 1 लाख रुपये देण्यासाठी 9 जानेवारीला पुसेगाव येथे पंचाच्या मार्फत जातपंचायत भरवण्यात आली होती. याविषयी माधुरी यांनी अंनिसकडे तक्रार केली.

त्याबाबत शंकर कणसे आणि मोहसीन शेख यांनी तातडीने दाखल घेतली. त्यांनी पुसेगाव पोलिस ठाण्याला त्याबाबत माहिती दिली. त्या दरम्यान जात पंचायतीच्या पंचांनी माधुरी व त्यांच्या मुलीला चाकूने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या अंतर्गत पुसेगाव पोलिस ठाण्यात संशयित पंचांवर गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शितोळे, हवालदार गीता अश्विनी नलवडे, विजय खाडे व सचिन जगताप या कारवाईत सहभागी होते.