विजेच्या धक्याने 2 शाळकरी मुलांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाई | शिरगाव (ता. वाई) येथे वाहत्या पाण्यात विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. यामध्ये विजेचा धक्का बसून, दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. साहिल लक्ष्मण जाधव (वय- 9), प्रतीक संजय जाधव (वय- 15, दोघेही रा.शिरगाव, ता. वाई) अशी विजेचा धक्का बसून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. ऐन नवरात्र उत्सवात जाधव कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरगावच्या हद्दीत कुंभारखाणी शिवारात वाघाचा मळा नावाचे शिवार आहे. या शिवारात साहिल जाधव आणि प्रतीक जाधव हे दोघे शेळी चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते ओढ्यातून जात होते. मात्र, महावितरणची लघुदाबाची गेलेली तार तुटून ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात पडली होती. त्यामुळे पाण्यात विजेचा प्रवाह सुरू होता. या विजेच्या प्रवाहाचा दोघांना जोरदार धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत अन्य तीन मुले होती, परंतु त्या दोघांना शाॅक लागल्याचे समजताच, ती मुले सावध झाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून इतर तीन मुलांची यातून सुटका झाली आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर दोन्ही मुलांना तातडीने भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते, परंतु त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे यांच्यासह इतर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकारानंतर महावितरणचे भुईंज शाखा अधिकारी राजेंद्र रासकार यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तुटलेल्या तारेची दुरुस्ती केली. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे शिरगाव आणि पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.