विशेष प्रतिनिधी । ‘जागतिक दारिद्र्य निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल सोमवारी जाहीर झाले. त्यानंतर विविध स्तरांतून बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं जात असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तसंच बॅनर्जींना मिळालेल्या नोबेलबाबत ट्विट करताना हेगडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने जाहीरनाम्यात समावेश केलेल्या ‘न्याय’ योजनेच्या संकल्पनेची मांडणी करण्यात अभिजीत बॅनर्जी यांची महत्त्वाची भूमिका होती. गरिबी हटवणारी ‘न्याय’ योजना असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. याबाबत ट्विट करताना हेगडे यांनी, “ज्या व्यक्तीने ‘पप्पू’च्या माध्यमातून महागाई आणि करप्रणाली वाढवण्याची शिफारस केली होती, त्या व्यक्तीला २०१९ चा नोबेल पुरस्कार मिळाला. न्याय योजनेचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला नोबेल मिळाल्याबाबत ‘पप्पू’ला आनंद झाला असेल” असं म्हटलं. पण, त्यांच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांकडून हेगडे यांच्यावरच टीका होत असून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न होत आहे.
दरम्यान ‘‘बॅनर्जी, डफलो, क्रेमर यांच्या संशोधनामुळे जागतिक दारिद्र्याशी सामना करण्याच्या आमच्या क्षमतेत भरपूर सुधारणा झाली. प्रयोगावर आधारित त्यांच्या नव्या दृष्टिकोनामुळे केवळ दोन दशकांत विकासात्मक अर्थशास्त्राचे स्वरूप बदलले आणि आता या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे,’’ अशा शब्दांत नोबेल निवड समितीने पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला.
अनंतकुमार हेगडे यांचे ट्विट –
Yes, the man who recommended #inflation & #tax rates to be raised for our country via #Pappu, has been recognized and awarded #NobelPrize2019.
Pappu can really feel proud of his #NYAY proponent while the poor nation missed out the benefits!!!!!!!!!!
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) October 14, 2019