कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. देशात लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर अनेकांनी स्थलांतर करण्यास सुरूवात केली. या कालावधीत अनेक परप्रांतीय कराडमार्गे पुढे स्थलांतरीत होत होते. त्यापैकी काहीजणांना आटकेटप्पा येथील विराज हॉलमध्ये स्थलांतरीत कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटे हॉलच्या पाठीमागील बाजुस असणार्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून ते 21 जण पळून गेले.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर 21 जणांवर कजहाड तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पळून गेलेल्या या 21 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, ते सापडले नाहीत. त्यामुळे याबाबत तातडीने महसूल विभागाला माहिती देवुन संबंधित 21 जणांचे नाव व पत्ता कळविण्याची विनंती करण्यात आली. मात्र, रजिस्टर अपडेट नसल्याचे महसुल विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे संबंधितांची पुर्ण नावे व पत्ते पोलिसांना मिळाले नाहीत.
रेकॉर्डनुसार इसेवरमन, जगल टी, वसंत एस., कृष्णा राजन, दिनेश डी., तमील वरमन सी., व्यंकटेश के., अजीत आर., विजय, मुकेश, सत्य, व्यंकटेश, मुरगन, रघुकुमार, प्रदीप, पार्थी, महेश, हरो, लक्ष्मण, अजित एवढीच नावे पोलिसांना मिळाली आहेत.