अपहार 24 कोटींचा : चिंतामणी पार्श्वनाथ पतसंस्थेच्या 6 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोळकी (ता. फलटण) येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, 24 कोटी 1 लाख 60 हजार 761 रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.प्रदीप बापूचंद गांधी, धनेश नवलचंद शहा, भूषण कांतीलाल दोषी, नाना खंडू लांडगे, लाला तुकाराम मोहिते, अजय अरविंद शहा (सर्व रा. फलटण) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, चिंतामणी पतसंस्थेत अपहार झाल्याप्रकरणी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखा संशयित आरोपींचा शोध घेत असताना ते सापडत नव्हते. सोमवारी संशयितांची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर फलटण परिसरातून ताब्यात घेऊन त्याना अटक केली.

दरम्यान, पतसंस्थेतील ठेवीदार हवालदिल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा होत होत्या. सोमवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता पुढे काय होणार? याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी भोसले, प्रमोद नलवडे, पोलिस मनोज जाधव, संतोष राउत, रफिक शेख, प्रसाद जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.