औषधे नसल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 12 लहानबाळांसह एकूण 24 जणांचा मृत्यू; शिंदे फडणवीस सरकारने उत्तर द्यावं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील एका शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 12 नवजात बालकांचा आणि काही प्रौढ रुग्णाचा समावेश आहे.  योग्य उपचार न झाल्यामुळे या सर्व रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप रुग्णांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुख्य म्हणजे, हे सर्व आरोप रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आले आहे. त्याचबरोबर, 24 मृत्यूंपैकी 12 प्रौढ रुग्णांचा मृत्यू विविध आजारांनी मुख्यतः साप चावल्यामुळे झाला असल्याचे स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिले आहे. आता या संपूर्ण घटनेमुळे नांदेडमधील वातावरण तापले आहे. तर दुसऱ्या बाजूला या घटनेचा विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारला आहे.

24 तासांमध्ये 24 मृत्यू

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय तृतीय स्तरावरील रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातून रुग्ण येत असतात. मात्र याच रुग्णालयामध्ये 1 ऑक्टोंबरपासून ते 24 तासांमध्ये 24 मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व घटनेप्रकरणी रुग्णांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. तर दुसऱ्या बाजूला योग्य वेळेत उपचार न केल्यामुळे आणि योग्य औषधे न पुरवल्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. परंतु हे सर्व आरोप रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, 24 रुग्ण दाखल होण्यापूर्वीच अत्यावस्थेत होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

घटनेचा तपास करण्यासाठी समिती स्थापन

नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व घडलेल्या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हॉस्पिटलमध्ये काय झाले याबाबत अधिक माहिती घेतली जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल” असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्याचबरोबर, रुग्णालयात घडलेल्या सर्व घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे.

इतकेच नव्हे तर, “नांदेड घटनेप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांना उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी स्वत: हॉस्पिटलला भेट देत आहे” असे देखील डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले आहे. सध्या या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. एका शासकीय रुग्णालयातच तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून नांदेडमध्ये झालेल्या या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या सर्व घटनेविषयी बोलत असताना, “शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय तृतीय स्तरावरील रुग्णालय आहे. या रुग्णालयांमध्ये दूरच्या ठिकाणाहून लोक उपचारासाठी येत असतात. मात्र काही काळामध्ये रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती त्यामुळे अनेक समस्या देखील निर्माण झाल्या होत्या. मात्र तरीदेखील आम्ही स्थानिक पातळीवरून औषधे विकत घेतली आणि रुग्णांना योग्य वेळेत पुरवली. अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ज्या 24 रुग्णांचा मृत्यू झाला त्यातील 12 प्रौढ रुग्ण आहेत. यात पाच पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. तर इतर 12 रुग्णांमध्ये नवजात बालकांचा समावेश आहे.